OTT ने नाकारलं, दिग्दर्शकांचा अपमान केला; त्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, 100 कोटींचा टप्पा पार

कमी बजेट, मर्यादित प्रमोशन आणि सुरुवातीला मिळालेला थंड प्रतिसाद असूनही प्रेक्षकांनी हा चित्रपट स्वीकारला. त्यामुळे कथा आणि प्रेक्षकांचा विश्वास असेल तर मोठ्या स्टारकास्ट किंवा भव्य प्रमोशनशिवायही चित्रपट यशस्वी होऊ शकतो, हे या चित्रपटाने दाखवून दिलं आहे.

OTT ने नाकारलं, दिग्दर्शकांचा अपमान केला; त्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, 100 कोटींचा टप्पा पार
OTT ने नाकारलं, तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची दमदार झेप
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 10:17 AM

Hanuman Ansh: सध्या बॉक्स ऑफिसवर कोणत्याही मोठ्या स्टारशिवाय आणि भव्य प्रमोशनशिवाय एका चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या यशाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. सुरुवातीला अत्यंत कमी कमाई करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे नंतर जबरदस्त बूस्ट मिळाला. विशेष म्हणजे, थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मकडून नकार मिळाला होता. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी या अनुभवाबद्दल नुकताच खुलासा केला आहे.

नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित कथा

‘हनुमान अंश’ हा आध्यात्मिक गुरु नीम करोली बाबा यांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित चित्रपट आहे. नीम करोली बाबा यांना महाराजजी म्हणूनही ओळखलं जातं. हनुमान भक्ती, सेवा, प्रेम आणि अध्यात्म यांचा संदेश त्यांच्या विचारांमध्ये दिसून येतो. याच आध्यात्मिक प्रवासावर आधारित कथा दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी पडद्यावर मांडली आहे. विशाल चतुर्वेदी यांनी सांगितलं की, चित्रपटाची कथा घेऊन ते एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी नीम करोली बाबांची कथा अतिशय भावनिक पद्धतीने सांगितली. मात्र, संबंधित प्लॅटफॉर्मकडून या कथेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट, ज्या पद्धतीने कथा नाकारण्यात आली आणि ज्या भाषेचा वापर करण्यात आला, तो आपल्याला अपमानास्पद वाटल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे.

‘इंडिया टीव्ही’शी बोलताना विशाल चतुर्वेदी म्हणाले, “मी माझी कथा सांगण्यासाठी एका ओटीटी प्लॅटफॉर्मकडे गेलो होतो. मी महाराजजींची कथा अशा प्रकारे सांगितली की माझं मन हेलावलं आणि मला रडू आलं. त्यांनी ज्या पद्धतीने चित्रपट नाकारला, जी भाषा वापरली, ती मला अपमानास्पद वाटली. आम्ही निर्माते आहोत, आम्हाला 1000 वेळा नकार मिळाला आहे. पण ज्या पद्धतीने ते बोलले, त्यावरून मला वाटलं की त्यांच्या मनात भूतकाळातील कुठल्यातरी कचऱ्याने कथा भरलेली आहे.”

चतुर्वेदी यांच्या मते, एखादी कथा आवडली नाही किंवा ती समजली नाही, तर निर्मात्याला नकार देणं ही इंडस्ट्रीतील सामान्य गोष्ट आहे. मात्र, या प्रकरणात नकार देताना वापरलेली भाषा आणि कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना खटकला. या अनुभवामुळेच ही कथा अधिक ठामपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी केला.

‘हनुमान अंश’ हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रवेश झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई अवघी दहा लाख रुपये होती. सुरुवातीला फारशी चर्चा नसतानाही हळूहळू प्रेक्षकांच्या तोंडी प्रसिद्धीमुळे चित्रपटाला मोठा फायदा झाला. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आणि त्यानंतर त्याचा बॉक्स ऑफिस प्रवास वेगाने पुढे गेला. नुकतंच या चित्रपटाने कमाईचा 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us