हिना खानच्या ऑनस्क्रीन आईने भीतीपोटी का केलं बोटॉक्स? काही दिवसांपूर्वीच पतीपासून विभक्त

हिना खानच्या ऑनस्क्रीन आईने वयाच्या 43 व्या वर्षी बोटॉक्स केलं होतं. याची कबुली खुद्द तिने एका मुलाखतीत दिली होती. भीतीपोटी बोटॉक्स केल्याचं तिने सांगितलं. काही दिवसांपूर्वीच ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली.

हिना खानच्या ऑनस्क्रीन आईने भीतीपोटी का केलं बोटॉक्स? काही दिवसांपूर्वीच पतीपासून विभक्त
Hina Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2025 | 12:59 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अभिनेत्री लता सबरवालने हिना खानच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतरही लता सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ते स्कीनकेअर, मेकअप आणि रेसिपींचे विविध व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. वयाच्या 49 व्या वर्षीही ती अत्यंत सुंदर दिसते आणि आपल्या फिटनेसबद्दल कायम जागरुक असते. लता जरी नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यावर अधिक भर देत असली तरी काही वर्षांपूर्वी तिने बोटॉक्स केलं होतं. याचा खुलासा खुद्द लताने एका मुलाखतीत केला होता. वयाच्या 43 व्या वर्षी बोटॉक्स केलं होतं, असं तिने सांगितलं होतं. यामागचं कारणसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितलं होतं.

“मी जेव्हा कधी मेकअप करायचे, तेव्हा माझ्या डोळ्यांजवळ सुरकुत्या दिसून यायच्या. माझ्या मित्रमैत्रिणींना मी याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की हे सगळं खूप नॉर्मल आहे. परंतु तरीही मला दिसण्यावरून संकोचलेपणा जाणवत होता. माझं मन शांतच होत नव्हतं. अखेर मी डॉक्टरांच्या मदतीने माझ्या चेहऱ्यावर बोटॉक्स केलं. सर्वकाही नैसर्गिकरित्या सुंदर आहे, असं माझं डोकं मला सांगण्याचा प्रयत्न करत होतं. परंतु माझं मन मात्र बोटॉक्स करण्यावरच अडकलं होतं”, असं ती म्हणाली.

lata sabarwal

शोबिजच्या विश्वात काम करायचं असेल तर चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवाव्या लागतातच, असं लताचं मत होतं. अखेर तिने डोळे आणि ओठांजवळ बोटॉक्सचे इंजेक्शन्स घेतले. त्यावरही तिचं समाधान झालं नाही. बोटॉक्सचा परिणाम फक्त काही महिनेच टिकेल आणि त्यानंतर पुन्हा पहिल्यासारखं दिसू लागेल, असं तिला वाटत होतं. या सर्व गोष्टींमुळे मानसिक ताण जाणवल्याचाही खुलासा लताने केला. परंतु हळूहळू सर्व गोष्टी ठीक झाल्या आणि नैसर्गिकदृष्ट्याच आपलं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न लताने केला.

काही दिवसांपूर्वी लता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली. पती संजीव सेठशी तिने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांनी ‘ये रिश्ता..’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2010 मध्ये लता आणि संजीव यांनी लग्नगाठ बांधली आणि आता लग्नाच्या 15 वर्षांनंतर ते विभक्त झाले.