गाणं जुनं, पण क्रेझ नवी, ‘हम साथ साथ हैं’मधील या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम, बनतात लाखो रील्स
जन्माष्टमी आली की 27 वर्षांपूर्वीच्या या गाण्याची होते सर्वांनाच आठवण. तीन सुना, एक सासू आणि घरभर प्रेम असणारं हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय. आजही या गाण्यावर बनतात लाखो रील्स.

90 च्या दशकातील चित्रपट आणि गाण्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. त्या काळातील अनेक गाणी केवळ त्यांच्या सुरांमुळे नाही तर त्यातून दिसणारे प्रेम, नाती आणि कुटुंबातील आपुलकीमुळे आजही लक्षात राहिली आहेत. याच यादीतील एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘मैया यशोदा’. तब्बल 27 वर्षांनंतरही हे गाणं प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. विशेषतः जन्माष्टमीच्या उत्सवात या गाण्याला आजही विशेष महत्त्व दिलं जातं.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील ‘मैया यशोदा’ हे गाणं आहे. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या बाललीलांभोवती गुंफलेल्या या गाण्यात एका मोठ्या आणि प्रेमळ कुटुंबातील सुंदर नातेसंबंध पाहायला मिळतो.
गाण्यात नेमकं काय?
या गाण्यात करिश्मा कपूर, तब्बू आणि सोनाली बेंद्रे या तीनही अभिनेत्री सुना म्हणून दिसतात, तर ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांनी सासूची भूमिका साकारली आहे. सलमान खान, सैफ अली खान आणि मोहनीश बहल यांच्यामुळे गाण्यातील कौटुंबिक वातावरण आणखी खुलून येतं.
‘मैया यशोदा’ची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यातील साधेपणा आणि कुटुंबातील जिव्हाळा. तीनही सुना आपल्या सासूवर प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतात. घरातील हसणं, गप्पा, लहानसहान क्षण आणि एकमेकांमधील प्रेम यामुळे हे गाणं केवळ कृष्णाच्या बाललीलांपुरतं मर्यादित नाही, तर कुटुंबाच्या सुंदर भावनेलाही अधोरेखित करतं.
या गाण्याला अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल आणि कविता कृष्णमूर्ती यांनी आपला मधुर आवाज दिला आहे. रामलक्ष्मण यांनी या गाण्याला संगीत दिलं असून आर. किरण यांनी गीतलेखन केलं आहे. संगीत, शब्द, कलाकारांचा अभिनय आणि पडद्यावर दिसणारा कौटुंबिक जिव्हाळा यांचं सुंदर मिश्रण या गाण्याला आजही खास बनवतं.
आजही या गाण्यावर बनतात लाखो रील्स
काळ बदलला, संगीताचा ट्रेंड बदलला आणि नव्या पिढीची आवडही बदलली; मात्र ‘मैया यशोदा’ची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. जन्माष्टमीच्या काळात हे गाणं पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतं. अनेकजण या गाण्यावर डान्स व्हिडीओ, रील्स आणि कौटुंबिक सेलिब्रेशनचे व्हिडीओ शेअर करतात.
म्हणूनच आजही ‘मैया यशोदा’ हे गाणं केवळ एक जुना चित्रपटातील गीत राहिलेलं नाही, तर जन्माष्टमी, कुटुंब आणि जुन्या आठवणींना जोडणारा एक भावनिक ठेवा बनला आहे.
