44,000 स्क्वेअर फूटमध्ये फार्महाऊस, 21 प्रकारचे तांदुळ, कदंबाचे असंख्य झाड अन्… जॅकी श्रॉफ यांच्या बंगल्यातील ही गोष्ट आहे खास
बॉलिवूड अभिनेता जैकी श्रॉफ आपल्या अभिनयासोबतच निसर्गप्रेमासाठीही ओळखले जातात. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ते त्यांच्या अगामी चित्रपाटतील कॅमिओमुळे विषेश चर्चेत आहेत

बॉलिवूड अभिनेता जैकी श्रॉफ आपल्या अभिनयासोबतच निसर्गप्रेमासाठीही ओळखले जातात. हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ते त्यांच्या अगामी चित्रपाटतील कॅमिओमुळे विषेश चर्चेत आहेत. त्यांच्या या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच पुण्यातील त्यांच्या सुंदर फार्महाऊसचीही माहिती समोर आली आहे. या फार्महाऊसमध्ये जैकी श्रॉफ सेंद्रिय शेती करतात. फळे, भाज्या आणि तांदळाच्या विविध जातींची लागवड करून त्यांनी निसर्गाशी असलेले नाते जपले आहे.
44,000 स्क्वेअर फूट परिसरात फार्महाऊस
जैकी श्रॉफ यांच्या पुण्यातील फार्महाऊसची झलक प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर दाखवली होती. त्या कुक दिलीप यांच्यासोबत येथे पोहोचल्या होत्या. ‘ग्रीन फार्महाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाचा परिसर सुमारे 44,000 स्क्वेअर फूट आहे. मोठ्या जागेत पसरलेल्या या फार्महाऊसमध्ये हिरवळ, झाडे आणि शेती पाहायला मिळते. येथे विविध पिकांची लागवड करण्यासोबतच कोंबड्या आणि बदकांचे पालनही केले जाते. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण जीवनशैलीची अनुभूती मिळते.
700 हून अधिक झाडे आणि सेंद्रिय शेती
या फार्महाऊसमध्ये आंबा, पेरू, नारळ, शहतूत आणि लिंबासारखी अनेक फळझाडे आहेत. याशिवाय हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांचीही लागवड केली जाते. विशेष म्हणजे, येथे तांदळाच्या 21 वेगवेगळ्या जातींची शेती केली जाते. फार्महाऊसमध्ये जैकी श्रॉफ यांनी 700 हून अधिक झाडे आणि रोपे लावली आहेत. या झाडांची देखभाल करण्यासाठी ते स्वतःही वेळ देतात. शेती करताना ते अनवाणी पायांनी काम करत असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या या सवयीमुळे निसर्गाशी असलेले त्यांचे जवळचे नाते दिसून येते.
स्विमिंग पूल, जकूझी आणि पारंपरिक किचन
या फार्महाऊसमध्ये स्विमिंग पूल आणि जकूझीसारख्या आधुनिक सुविधाही आहेत. विशेष म्हणजे, आईच्या स्मरणार्थ त्यांनी सुमारे 12 वर्षांपूर्वी लावलेल्या कदंबाच्या झाडाची झलकही दाखवण्यात आली होती. या झाडाशी त्यांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या आहेत. येथील किचनदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. चूल आणि मातीची भांडी यांमुळे स्वयंपाकघराला गावाकडच्या घरासारखा पारंपरिक लुक मिळतो. आधुनिक सुविधा असूनही साधेपणा जपणारे हे फार्महाऊस जैकी श्रॉफ यांच्या निसर्गप्रेमाची आणि पर्यावरणाशी असलेल्या जिव्हाळ्याची खास झलक दाखवते.
