अख्खं गावच विकत घेतलं, जगातील एकमेव अभिनेता, गावातील खास गोष्टी माहीत आहे का?
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचे फ्रान्समधील 30 एकरवर पसरलेले खासगी गाव पुन्हा चर्चेत आहे. 2001 मध्ये खरेदी केलेल्या या प्रोवेन्सल गावात त्याने स्वतः अनेक आलिशान सुविधा निर्माण केल्या. एकेकाळी स्वर्गात असल्याचा अनुभव देणारे हे गाव त्याने विक्रीसाठी काढले होते, पण आता त्याने ते न विकता नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी त्याच्या एखाद्या सिनेमामुळे नाही तर त्यांच्या एका खास गोष्टीमुळे तो चर्चेत आहे. जॉनी डेप याचं फ्रान्समध्ये 30 एकरवर पर्सनल गाव आहे. हे गाव त्याने 2001मध्ये खरेदी केलं होतं. प्रोवेन्सल असं या गावाचं नाव आहे. सेंट ट्रोपेजच्या जवळ हे गाव आहे. हे गाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असून हे गाव काही सामान्य गाव नाही. या गावात असंख्य लग्जरी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळेच या गावाची सर्वाधिक चर्चा होत आहे.
जॉनी डेपचं हे गाव सेंट ट्रोपेजपासून सुमारे 17 मैल दूर आहे. एका रिपोर्टनुसार, त्याने 55 मिलियन अमेरिकन डॉलरला हे गाव खरेदी केलं होतं. त्यानंतर त्याने या गावासाठी आणखी 10 मिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले. हे गाव म्हणजे त्याचा एक प्रकल्पच होता. या गावातील जुन्या इमारतींना त्याने नवीन रुप दिलंय. मात्र, इमारतींचं ऐतिहासिक आकर्षण कायम ठेवलंय.
गाव झालं अत्यंत खास
गाव खरेदी केल्यानंतर डेपने या गावाला आपल्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. विशेष म्हणजे गावासाठी त्याने मोठ्या डिझायनरलाही बोलावलं नाही. त्याने स्वत: गावातील इमारती सजवल्या. त्यातून त्याची पसंती दिसून येते. या गावातील प्रत्येक गोष्टीत त्याची कलात्मकता दिसून येते. डेप आणि त्याची आधीची बायको वैनेसा पॅराडिस आणि त्याची मुलं लिली रोज आणि जॅक यांनी या गावात अनेक वर्ष घालवली आहेत. त्याने झगमगाटापासून दूर असलेलं फ्रान्सचं हे शांत गाव राहण्यासाठी निवडलं. या ठिकाणी तो आपल्या कुटुंबासोबत द्राक्षांच्या बागा, उद्याने आणि जुन्या दगडाच्या इमारतींच्यामध्ये राहतो.
एक दशकापूर्वी पीपल मॅगेझीनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत डेपने या ठिकाणच्या जगण्याला स्वर्ग असं संबोधलं होतं. वैनेसा आणि मुलांसोबत आम्ही दक्षिणेतील एका छोट्या गावात राहतो. मला असं वाटतं जणू काही मी स्वर्गातच आहे. ही 30 एकरची संपत्ती आहे. मी तिथे काय करतो हे तुम्हाला माहीत आहे का? मी तिथे काहीच करत नाही. केवळ माळी काम करणं आणि फुलांना उमलताना पाहणं हाच माझा दिनक्रम असतो. याचाच मी आनंद लूटत असतो, असं तो या मुलाखतीत म्हणाला होता.
गावात नेमकं काय?
सुमारे 30 एकरावर हे गाव वसलेलं आहे. या गावात 1000 वर्ग मीटर राहण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. गावात अनेक गेस्ट हाऊस आहेत. या ठिकाणी कुटुंब आणि मित्रांसोबत तुम्ही आराम करू शकता. गावातील एक मुख्य हाऊस 4500 वर्ग फुटाहून अधिक मोठं आहे. याशिवाय सहा गेस्ट कॉटेज, सुमारे 15 बेडरूम आणि 14 बाथरूम आहेत. या ठिकाणी कॅफे मार्चेलिन नावाचा एक बिस्ट्रो, दोन स्विमिंग पूल, सुंदर बगीचे आणि ऑलिव्हची उद्याने आहेत. एक कलाकारांचा स्टुडिओ, एक शिकाऱ्याची केबिन आणि स्टाफ हाऊसही या ठिकाणी आहे. डेपने त्याचा मुलगा जॅकसाठी एक स्केट पार्कही बनवलं आहे. या ठिकाणी पायरेट्स ऑफ द कॅरेबियन थीमवर वाइन सेलर सुद्धा आहे.
गाव विकायचं होतं
डेप आणि पॅराडिस विभक्त झाल्यानंतर डेपने गाव विकण्याचा प्रयत्न केला होता. 2015मध्ये त्याची किमत 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स होती. पण हे गाव विकत घेण्यासाठी कोणी खरेदीदारच आला नाही. त्यानंतर 2021मध्ये 55 मिलियन अमेरिकन डॉलर पुन्हा लिस्ट करण्यात आले. जून 2024 मध्ये आलेल्या वृत्तानुसार, डेपने आता गाव विकण्याचा नाद सोडला असून गावाची डागडुजी करण्यावर भर दिला आहे.