जनावरांसारखं वागू नका..; लाइव्ह शोमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर भडकले कैलाश खेर

ग्वाल्हेरमध्ये शो सुरू असताना अचानक काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ही गर्दी अनियंत्रित झाली आणि काहींनी थेट बॅरिकेट्स तोडून स्टेजच्या दिशेने धाव घेतला. अखेर कैलाश खेर यांचा शो मधेच थांबवावा लागला.

जनावरांसारखं वागू नका..; लाइव्ह शोमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर भडकले कैलाश खेर
Kailash Kher concert
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 26, 2025 | 9:26 AM

प्रसिद्ध गायक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात एक मोठी घटना घडली. ग्वाल्हेरमध्ये ते परफॉर्म करत असताना अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. लोकांनी अक्षरश: बॅरिकेड्स तोडून स्टेजवर धाव घेतली. यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. या गोंधळामुळे कैलाश खेर यांचा शो मध्येच थांबवावा लागला. नाताळच्या पूर्वसंध्येला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती ग्वाल्हेरच्या मैदानावर साजरी केली जात होती. यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कैलाश खेर उपस्थित होते. ते स्टेजवर परफॉर्म करताना अचानक प्रेक्षकांनी गोंधळ घातला.

नेमकं काय घडलं?

ग्वाल्हेरमधल्या या कार्यक्रमात कैलाश खेर यांच्या परफॉर्मन्सदरम्यान मोठा गोंधळ झाला. अचानक गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. लोकांनी आधी बॅरिकेड्स तोडले आणि नंतर कैलाश खेर यांच्या जवळ जाण्यासाठी स्टेजवर चढण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे कैलाश खेर प्रचंड संतापले आणि त्यांनी गर्दीच्या वर्तनाची तुलना थेट जनावरांशी केली.

कार्यक्रमातील गर्दी अचानक अनियंत्रित झाली आणि त्यांनी बॅरिकेड्स तोडून स्टेजवर पोहोचण्यासाठी उड्या मारल्या. अवघ्या काही क्षणांत ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या कैलाश खेर यांना स्टेजवरून ओरडावं लागलं की, “तुम्ही जनावरांसारखे वागत आहात, कृपया थांबा.” या घटनेनंतर कैलाश खेर यांचा कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुफी गाण्यांसाठी कैलाश खेर लोकप्रिय

कैलाश खेर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय गायक आहेत. त्यांची अनेक गाणी हिट झाली आहेत. ‘तेरी दिवानी’, ‘बम लहरी’, ‘पियाँ घर आवेंगे’, ‘सैयां’ यांसारखी त्यांची गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. कैलाश खेर हे भारतात आणि भारताबाहेरही सतत लाइव्ह शो करत असतात. त्यांनी याआधीही नवी दिल्ली, मुंबईत लाइव्ह परफॉर्म केले आहेत. त्यांच्या कॉन्सर्टला प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळते. कैलाश खेर यांचे सर्व शोज हाऊसफुल होतात. त्यांचा पुढील लाइव्ह शो 27 डिसेंबर रोजी गुजरातमधील वडोदरा इथं आहे.