शुभांगी अत्रेनं का सोडली ‘भाभीजी घर पर है’ मालिका; खरं कारण आलं समोर
अभिनेत्री शुभांगी अत्रेनं 'भाभीजी घर पर है' या मालिकेचा निरोप घेतला आहे. यापुढे ती या मालिकेत अंगुरी भाभीच्या भूमिकेत दिसणार नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगीने यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अभिनेत्री शुभांगी अत्रे गेल्या 10 वर्षांपासून या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारतेय. त्याआधी मालिकेत अभिनेत्री शिल्पा शिंदे ही अंगुरी भाभीच्या भूमिकेत होती. निर्मात्यांसोबत झालेल्या वादानंतर तिने अचानक मालिका सोडली होती. आता शुभांगीनंतर पुन्हा एकदा शिल्पा या मालिकेत कमबॅक करतेय. अशातच शुभांगी ही मालिका का सोडतेय, असा प्रश्न अनेकांना पडला. कारण शिल्पानंतर तिने अंगुरी भाभीची भूमिका चोख साकारली होती आणि तिला प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळत होतं. आता तिने मालिका सोडण्यामागची दोन कारणं सांगितली आहेत.
शुभांगीच्या मते, या मालिकेत अनेक वर्षांपर्यंत काम केल्याने एक कलाकार म्हणून काहीच प्रगती होत नव्हती. त्याचप्रमाणे आपण दुसरं काहीतरी करावं अशी मुलीचीही इच्छा असल्याचं तिने सांगितलं. विकी लालवानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत शुभांगी म्हणाली, “मी गेल्या दीड वर्षापासून ही मालिका सोडण्याचा विचार करत होते. मी मालिकेत काम करताना सतत विचार करायचे की, इथवर ठीक आहे, पण आता पुढे काय? परंतु कधीच कोणतं पाऊल उचललं नव्हतं. अखेर माझ्या मुलीनेच मला असा निर्णय घेण्यासाठी प्रेरित केलं. तिच्यामुळे आता पुढे जाऊ शकले.”
View this post on Instagram
“माझी मुलगी आशी ही माझी सर्वांत चांगली मैत्रीण आणि माझी सर्वांत मोठी टीकाकारसुद्धा आहे. ती मला सतत सांगायची की, आई आता तुला वेगळं काहीतरी करायला हवं, जसं की पोलीस अधिकारी किंवा हटके काहीतरी भूमिका कर. मुलीच्या बोलण्यावरून मला जाणवलं की खरंच आता पुढे जायची आणि काहीतरी वेगळं करायची खूप गरज आहे आणि हीच ती वेळ आहे. म्हणून मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला”, असं शुभांगीने पुढे सांगितलं.
शुभांगी अत्रे म्हणाली की, ‘भाभीजी घर पर है’मध्ये काम केल्यानंतर तिला प्रगतीची संधी मिळाली नाही. ती म्हणाली, “अभिनेत्री म्हणून माझी प्रगतीच होऊ शकली नाही. मी पैसे कमवत होते, मला प्रेम मिळत होते पण कलाकार म्हणून माझी भूक भागवली जात नव्हती. आता नवीन पात्र साकारण्याची आणि स्वत:ला आव्हान देण्याची माझी इच्छा आहे.”
