Kangana Ranaut | ‘पठाण’च्या कमाईच्या आकड्यांची चर्चा होत असतानाच कंगनाचं बेधडक ट्विट; फिल्म इंडस्ट्रीवर साधला निशाणा

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंगनाने त्यावरून अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे.

Kangana Ranaut | पठाणच्या कमाईच्या आकड्यांची चर्चा होत असतानाच कंगनाचं बेधडक ट्विट; फिल्म इंडस्ट्रीवर साधला निशाणा
Kangana Ranaut
| Updated on: Jan 25, 2023 | 12:02 PM

मुंबई: बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत ट्विटर अकाऊंटवर परतली आहे. कंगनाचा अकाऊंट सस्पेंड करण्यात आला होता. मंगळवारी (24 जानेवारी) तिने नवीन ट्विट करत नेटकऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. ट्विटरवर परत येताच कंगनाने फिल्म इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंगनाने त्यावरून अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे.

कंगनाचं ट्विट-

‘फिल्म इंडस्ट्री इतकी मूर्ख आहे की जेव्हा जेव्हा त्यांना एखाद्या कलेचं, निर्मितीचं किंवा प्रयत्नांचं यश दाखवायचं असतं तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर पैशांचे आकडे फेकतात. जणू कलेचा दुसरा कोणता हेतूच नसतो. यातून त्यांचं खालच्या दर्जाचं जीवन आणि ज्याप्रकारचं वंचित आयुष्य ते जगतात ते उघड होतं,’ असं तिने म्हटलंय.

‘सुरुवातीला कला ही मंदिरांमध्ये बहरली आणि नंतर ती साहित्य/थिएटर्स आणि अखेरीस चित्रपटगृहांमध्ये पोहोचली. हा एक उद्योग निश्चितच आहे परंतु तो अब्जावधी डॉलर कमावणाऱ्या इतर व्यवसायांप्रमाणे मोठ्या आर्थिक नफ्यासाठी डिझाइन केलेला नाही. म्हणून कला आणि कलाकारांची पूजा केली जाते, उद्योगपती किंवा अब्जाधीशांची नाही,’ अशा शब्दांत तिने टोला लगावला आहे.

या ट्विटमध्ये तिने एक सल्लासुद्धा दिला आहे. ‘जरी कलाकारांनी देशातील कला आणि संस्कृती प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी ते निर्लज्जपणे न करता तारतम्य बाळगून काळजीपूर्वक करावं,’ असं तिने लिहिलं आहे.

मे 2021 मध्ये कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. जेव्हा इलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवला, तेव्हा कंगनाच्या चाहत्यांनी तिला ट्विटरवर परत आणण्याची विनंती केली होती.

कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.