Kishore Kumar : मराठी गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांचा नकार; गीतकाराची भन्नाट युक्ती, एका रात्रीत बदलली गोष्ट; आजही प्रत्येकाच्या ओठांवर असतं हे गाणं

Kishore Kumar Marathi Song : किशोर कुमार यांनी गायलेल्या मराठी गाण्याचा किस्सा जाणून घ्या.

Kishore Kumar : मराठी गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांचा नकार; गीतकाराची भन्नाट युक्ती, एका रात्रीत बदलली गोष्ट; आजही प्रत्येकाच्या ओठांवर असतं हे गाणं
| Updated on: Nov 26, 2026 | 9:28 PM

मराठी संगीतविश्वात अशी काही गाणी आहेत, जी कितीही वर्षे झाली तरी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. जुन्या गाण्यांची जादू आजही कायम आहे. असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘अश्विनी ये ना’. 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गायक किशोर कुमार यांचा आवाज लाभला आहे. त्यांच्या खास अंदाजातील गायकीमुळे या गाण्याला वेगळीच ओळख मिळाली.

मराठी गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांनी सुरुवातीला दिला होता नकार!

Loading...

या गाण्यामागचा किस्सा अभिनेता आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. ‘गंमत जंमत’ चित्रपटासाठी त्यांना किशोर कुमार यांच्याकडून हे गाणं गाऊन घ्यायचं होतं. मात्र, किशोर कुमार यांना मराठी भाषेतील उच्चारांची अडचण वाटत होती. विशेषतः ‘च’ आणि ‘ळ’ या अक्षरांचे उच्चार त्यांना व्यवस्थित करता येत नव्हते. त्यामुळे मराठी गाणं गाण्याबाबत ते सुरुवातीला फारसे उत्सुक नव्हते.

मात्र, किशोर कुमार यांच्याकडूनच हे गाणं गाऊन घ्यायचं, असा सचिन पिळगावकर यांचा आग्रह होता. अखेर गीतकार शांताराम नांदगावकर यांनी एक भन्नाट युक्ती शोधून काढली. त्यांनी गाण्याचे शब्द लिहिताना ‘च’ आणि ‘ळ’ या अक्षरांचा वापरच टाळला. त्यामुळे किशोर कुमार यांच्यासाठी गाणं गाणं सोपं झालं आणि त्यांनी या गाण्याला आपला आवाज दिला. अशा प्रकारे एका छोट्याशा युक्तीमुळे मराठी संगीतविश्वाला एक अजरामर गाणं मिळालं.

गाण्याच्या शूटिंगवेळी सचिन पिळगावकर यांनीच केलं होतं नृत्यदिग्दर्शन!

या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानही एक रंजक प्रसंग घडला होता. ‘अश्विनी ये ना’ या गाण्याचं शूटिंग सुरू असताना नृत्यदिग्दर्शक काही कारणास्तव सेटवर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सचिन पिळगावकर यांनी स्वतः स्वीकारली. त्यांनीच गाण्यातील डान्स स्टेप्स बसवल्या.

‘अश्विनी ये ना’ हे गाणं अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. किशोर कुमार यांच्यासोबत अनुराधा पौडवाल यांनीही या गाण्याला आपला आवाज दिला होता. संगीतकार अरुण पौडवाल यांनी या गाण्याला संगीत दिलं, तर शांताराम नांदगावकर यांनी त्याचे शब्द लिहिले होते. किशोर कुमार यांनी अशोक सराफ यांच्यासाठी आणखी मराठी गाणं गाण्याचं आश्वासन दिलं होतं. ‘तुझी माझी जोडी जमली’ हे गाणंही त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं होतं. मात्र, त्यानंतर किशोर कुमार यांचं निधन झालं.

1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. अनेक वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us