
सध्या सर्वत्र एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे रणवीर सिंहचा ‘धुरंधर’. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. येत्या 19 मार्च रोजी ‘धुरंधर’चा दुसरा भाग ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच एक चित्रपट असा सुद्धा आहे जो हळूहळू का होईना परंतु ओटीटीवर ‘धुरंधर’ला टक्कर देतोय. नेटफ्लिक्सच्या ग्लोबल टॉप 10 मध्ये सध्या आणखी एका हिंदी चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतोय. या चित्रपटाचं नाव आहे ‘अक्युज्ड’. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा आणि प्रतिभा रांटा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने नवा विक्रम रचला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामाने नेटफ्लिक्सवरील ग्लोबल टॉप 10 नॉन इंग्लिश चित्रपटांच्या श्रेणीत अव्वल स्थान मिळवत इतरांना मागे टाकलं आहे. 74 देशांमध्ये हा रेकॉर्ड करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाची कथा मीरा आणि गीतिका या लेस्बियन जोडप्याभोवती फिरते. यामध्ये गीतिकाची भूमिका अभिनेत्री कोंकना सेन शर्माने साकारली असून मीराच्या भूमिकेत ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री प्रतिभा रांटा आहे. हे दोघं विवाहित लेस्बियन कपल आहेत. ‘डॉक्टर जी’ फेम दिग्दर्शक अनुभूती कश्यपने पुन्हा एकदा सर्वांत हटके कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. चित्रपटातील दोन्ही कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: कोंकणा सेन शर्माने तिच्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. तर मीराची भूमिका साकारणारी प्रतिभा हिनेही उल्लेखनीय काम केलं आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत माहितीनुसार, अक्युज्डला प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात 1.35 दशलक्ष वॉच अवर्स (पाहिले गेलेले तास) मिळाले आहेत. त्याचसोबत या चित्रपटाला 7.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
गीतिका आणि मीरा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खुश असतात आणि एकेदिवशी ते एका बाळाला दत्तक घेण्याचा विचार करतात. ज्यादिवशी ते ही बातमी जवळच्या लोकांमध्ये जाहीर करतात, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गीतिकाच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट येतो. या कथेत मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा एक अनोळखी व्यक्ती गीतिकावर लैंगिक छळाचा आरोप करतो. बघता बघता ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. यामुळे रुग्णालयातील स्टार डॉक्टर गीतिकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. त्यानंतर तिच्या नोकरीवरही गदा येते. या चित्रपटाचा क्लायमॅक्ससुद्धा विचारात पाडणार आहे.