Kranti Redkar : आमच्या घरात 17 तास रेड चालू होती…क्रांती रेडकरनं सांगितला प्रसंग
Kranti Redkar : क्रांती रेडकरच्या घरी एकदा 17 तास रेड चालू होती. याबद्दल अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीनं एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याशी लग्न केलं आहे. सुशांत सिंह राजपूतपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंतच्या अनेक बॉलिवूड कलाकारांची प्रकरणं समीर वानखेडे यांनी हाताळली आहेत. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री क्रांती रेडकरनं याबद्दल भाष्य केलं आहे.
लग्नाआधीच समीर यांनी क्रांतीला या सगळ्याची कल्पना दिलेली, असं अभिनेत्री म्हणाली. क्रांती रेडकर म्हणाली की, ‘समीर खूप चांगला नवरा आहे, तो खूप चांगला बाबा आहे आणि त्यापेक्षाही तो खूप चांगला माणूस आहे. त्याने मला लग्न करताना दहा वेळा सांगितलं होतं, तू एका इमानदार ऑफिसरशी लग्न करते आहेस. त्यामुळे भविष्यात बरंच काही होऊ शकतं. आपल्याला कशातही गोवलं जाऊ शकतं. आपल्या घरात कधी चौकशी होऊ शकते, कधी रेड होईल तर तू यासाठी तयारीत राहा. आजही तो प्रत्येक गोष्टीचं बिल सांभाळून ठेवतो. तो नेहमी नियमाने वागणारा माणूस आहे. मला याचा का त्रास होईल? मी हे सगळं आता स्वीकारलंय. याशिवाय मलाही आवडतं त्याची बायको म्हणून मिरवायला. समाजात मान आहे, रुबाब आहे.’
क्रांतीनं सांगितला प्रसंग
एक प्रसंग सांगताना क्रांती म्हणाली की, ‘आमच्या घरात १७ तास रेड चालू होती. या सगळ्या बाबतीत मी खूप धीट आहे. मी अशी पटकन घाबरत वगैरे नाही. मानसिकरित्या मी खूप स्ट्राँग आहे, त्यात आम्हाला कुणालाही फोन करण्यास परवानगी नव्हती. बरं जेव्हा रेड सुरू झाली तेव्हा समीर घरातही नव्हता. मी आणि माझ्या मुलीच घरात होतो. मी शांतपणे त्यांना सांगितलं, हे माझं घर, ही माझ्या कपाटाची किल्ली, तुम्हाला जे बघायचंय ते बघा आणि न्यायचंय ते न्या. फक्त माझे घरखर्चाचे १७ की १३ हजार रुपये होते, हे फक्त बघा. नाहीतर ते सुद्धा न्यायचे आहेत तर घेऊन जा. त्यांनी संपूर्ण घर शोधलं, काय झालं? काय मिळालं? आपण काही केलं नाही ना? तर आपण घाबरायचं नाही. त्यांना मनाची शांती करु देत. आपण नेहमी सिस्टीमला सहकार्य करायचं. आम्ही सुद्धा तेच केलं.’
‘मी छोट्या छोट्या गोष्टींनी भावुक होते. ते म्हणजे, एखाद्याला जेवण मिळत नसेल तर मला वाईट वाटतं. पण, आमच्यासाठी हा लढा आहे. जेव्हा एखादा माणूस हरतो, तेव्हा रडतो. आम्ही अजूनही लढतोय. ताठ मानेनं सगळ्याला सामोरं जातोय. त्यामुळे मला नवऱ्याकडूनच प्रेरणा मिळतेय.’ असंही क्रांती शेवटी म्हणाली. ‘आरपार‘ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकर बोलत होती.