Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ कसा ठरला सुपरहिट? कुणाल खेमूने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला “दोन आठवड्यांनंतर..”
Hanuman Ansh: अभिनेता कुणाल खेमूने 'हनुमान अंश'च्या यशावर वक्तव्य केलं आहे. हा चित्रपट इतका हिट कसा झाला, यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने तब्बल 350 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

Hanuman Ansh: अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा कुणाल खेमू सध्या त्याच्या आगामी ‘व्हाइब’ या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कुणालने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सध्या चर्चेत असलेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. विशेष म्हणजे, कॉमेडी आणि अॅक्शन-कॉमेडीनंतर भविष्यात धार्मिक चित्रपट करण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. ‘हनुमान अंश’ या धार्मिक चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल कुणाल खेमूला विचारण्यात आलं. तसंच, भविष्यात स्वतः एखादा धार्मिक चित्रपट बनवण्याचा विचार आहे का, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला.
यावर कुणालने अद्याप असा कोणताही ठोस विचार केलेला नसल्याचं सांगितलं. मात्र, “कधीही नाही म्हणू नये असं म्हणतात,” असं म्हणत त्याने भविष्यात अशा प्रकारच्या चित्रपटाची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही. त्याचवेळी ‘हनुमान अंश’ला मिळत असलेल्या यशाबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. कुणालच्या मते, ‘हनुमान अंश’च्या यशाचं कारण केवळ त्याची चांगली कथा आणि प्रेक्षकांशी जोडलं जाणं हे नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यावर दाखवलेला विश्वास आणि चिकाटी हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
कुणालने सांगितलं की, एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या एक-दोन आठवड्यांत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसेल, तर तो थिएटरमध्ये टिकवून ठेवणं कठीण होतं. प्रेक्षकांची संख्या कमी झाली की थिएटरमधील शो कमी होतात आणि त्यामुळे चित्रपटाचा व्यवसाय आणखी प्रभावित होऊ शकतो. ‘हनुमान अंश’च्या बाबतीतही सुरुवातीच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं कुणालने सांगितलं. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाबाबत हार मानली नाही. त्यांनी चार आठवडे हा चित्रपट थिएटरमध्ये टिकवून ठेवला.
कुणालच्या मते, दोन आठवड्यांनंतर निर्मात्यांनी चित्रपट थिएटरमधून काढून घेण्याचा निर्णय घेतला असता, तर त्यानंतर मिळालेलं यश कदाचित पाहायला मिळालं नसतं. त्यांच्या दृढनिश्चयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ मिळाला. कुणालने ‘हनुमान अंश’च्या यशातील आणखी एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष वेधलं. त्याच्या मते, या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपट, कला आणि सिनेमाचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केलं आहे. त्यामुळे केवळ बॉक्स ऑफिसवरील आकडे महत्त्वाचे नसून, एखादा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचतो आणि त्यांच्यावर कसा प्रभाव टाकतो, हेही महत्त्वाचं असल्याचं त्याच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं.
