रेणुका शहाणेंच्या डेटिंगबद्दल समजताच माधुरी दीक्षितने विचारलेला हा प्रश्न; म्हणाली ‘आशुतोष राणा भांडणसुद्धा..’
'कोण होणार करोडपती'च्या सेटवर रेणुका शहाणे यांनी हा किस्सा सांगितला. आशुतोष राणा यांना डेट करत असल्याचं समजल्यानंतर माधुरी दीक्षितने त्यांना एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर सेटवर माधुरीने आशुतोष राणा यांची नक्कलसुद्धा करून दाखवली.

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे या तिघी सध्या चर्चेत आहेत. निमित्त आहे ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं! या कार्यक्रमाच्या मंचावर तब्बल 32 वर्षांनंतर ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातील या तिन्ही अभिनेत्री एकत्र आल्या. जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी अनेक मजेशीर किस्से सांगितले. यावेळी रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांना डेट करत असतानाचा एक खास प्रसंग सांगितला. त्यावर माधुरी दीक्षितने आशुतोष राणा यांची नक्कल करत उपस्थितांना हसवलं. या खास भागाचा प्रोमो सध्या चर्चेत आला आहे.
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे एकत्र आल्या असताना जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी रेणुका यांनी आशुतोष राणा यांच्याशी असलेल्या नात्याच्या सुरुवातीच्या काळातील एक मजेशीर किस्सा सांगितला. रेणुका म्हणाल्या, “मी जेव्हा राणाजींना डेट करत होते आणि माधुरीला जेव्हा कळलं, तेव्हा तिने मला विचारलं होतं की, तुला त्यांच्याबद्दल खात्री आहे ना?”
रेणुका यांचा हा किस्सा ऐकल्यानंतर माधुरीनेही त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. आशुतोष राणा यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या बोलण्याच्या शैलीबद्दल तिने विनोदी अंदाजात प्रश्न विचारला. त्यामुळे कार्यक्रमातील वातावरण अधिकच रंगतदार झालं. रेणुका शहाणे यांच्या या खुलाशानंतर माधुरी दीक्षितने आशुतोष राणा घरीसुद्धा कवितेतून संवाद साधतात का, असं विचारलं. त्यावर रेणुका यांनी होकार दिला. यानंतर माधुरीने ‘भांडण कवितेतूनच करत असतील’ असं म्हणत आशुतोष राणा यांची नक्कल करून दाखवली.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
आशुतोष राणा यांच्या खास संवादफेकीची शैली आत्मसात करत माधुरीने “ऐसा क्यु किया हमने देखिये…” असं म्हणत त्यांची मिमिक्री केली. तिच्या या विनोदी अंदाजामुळे कार्यक्रमात हास्याची लहर पसरली. माधुरीची ही वेगळी बाजू पाहायला मिळाल्याने चाहत्यांसाठीही हा क्षण खास ठरला. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने निशा, रेणुका शहाणे यांनी पूजा, तर प्रिया बेर्डे यांनी चमेलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणी, संवाद आणि कलाकारांमधील नातेसंबंध आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
आता ‘कोण होणार करोडपती’च्या निमित्ताने या तिघी एकत्र आल्याने जुन्या आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून, या मंचावर कलाकारांशी होणाऱ्या गप्पांमधून अनेक रंजक किस्से समोर येत आहेत. रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीमुळे या भागाला विशेष रंगत आली आहे.
