Pankaj Dheer Death : ‘महाभारता’त कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी

Pankaj Dheer Death : महाभारत कर्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. पंकज यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते.

Pankaj Dheer Death : महाभारतात कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी
Pankaj Dheer
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2025 | 1:49 PM

Pankaj Dheer Death : बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. त्यांचे जुने मित्र आणि सहकारी अमित बहल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर आज (15 सप्टेंबर, बुधवार) त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज यांनी आधी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘महाभारता’त अर्जुनाची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी दु:ख व्यक्त केलं. “हे खरंय की ते आता हयात नाहीत. वैयक्तिकदृष्ट्या मी माझ्या सर्वांच चांगल्या मित्राला गमावलंय. व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की त्यांचं निधन झालं आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतल्या कर्णाच्या भूमिकेनं त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. शिवाय ‘चंद्रकांता’मधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’ आणि ‘बादशाह’सारख्या चित्रपटांमध्येही ते झळकले.

मुंबईतील विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंकज यांच्या निधनावर CINTAA नेही शोक व्यक्त केला आहे. पंकज हे CINTAAचे माजी जनरल सेक्रेटरी होते. पंकज यांच्या पश्चात पत्नी अनीता धीर आणि मुलगा निकितन धीर असा परिवार आहे. पंकज यांचा मुलगा निकितनसुद्धा कलाविश्वात कार्यरत आहे. त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये थंगबलीची भूमिका साकारली होती. निकितनेही त्याच्या वडिलांप्रमाणेच पौराणिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. त्याची पत्नी म्हणजेच पंकज यांची सून कृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे.