CM Devendra Fadnavis : टायगर श्रॉफवरच्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा समोर येऊन बोलले, निश्चितपणे यात चॅलेंज आहे, कारण..
CM Devendra Fadnavis Reaction On Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काल हल्ला झाला. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी गोळीबार केला. या हल्ल्याने मुंबई, बॉलिवूडला हादरवून सोडलय. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.

“पोलिसांनी आरोपी शोधून काढेलत, त्यांचे आकाही शोधून काढलेत. त्यामुळे मी निश्चितपणे सांगीन की, अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. मुंबई पोलीस निश्चितपणे आरोपी शोधून काढतील. पोलिसांना उघडपणे कोणी चॅलेंज देऊ शकत नाहीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री बोलत होते. “हे डरपोक लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून वल्गना करतात. त्यांच्यात हिम्मत नाही. हे एकप्रकारे भाड्याचे लोक आहेत. त्याच्या आधारावर ऑपरेट करणारे लोक आहेत” असं फडणवीस म्हणाले. “निश्चितपणे पोलिसांना यात चॅलेंज येतं ते हे महाराष्ट्रातून ऑपरेट करत नाहीत. देशाच्या बाहेरुन ऑपरेट करतात. केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्र आणि देशाबाहेरुन ऑपरेट करणाऱ्या या गँगना मुंबई पोलीस नेस्तनाबूत करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“अशा कुठल्याही गँगला घाबरण्याचं कारण नाही. हे डरपोक लोकांचं कार्य आहे. हे घाबरणारे लोक आहेत. कुठेतरी लपून बसतात. तिथून कम्युनिकेशनचा वापर करुन धमक्या देत असतात. आम्ही प्रत्येक धमकी गांभीर्याने घेतो” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “मुंबई पोलीस प्रोफेशनल पोलीस फोर्स आहे. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलय की, अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत, त्यांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे निश्चितपणे सांगेन, कोणी घाबरण्याचं कारण नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुरक्षा का मागे ठेवलेली?
“शेवटी घटना गंभीर आहे, या घटनेच्या अनुषंगाने जे जे करण्याची गरज आहे, ते ते केलं जाईल. टायगर श्रॉफ यांना सुरक्षा आहे. त्यांनी ती सुरक्षा काही कारणाने मागे ठेवली होती. त्यांच्यासोबत सुरक्षा कवच नव्हतं. अशावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्या संदर्भातील माहिती पुढे येईल. आरोपींना अजून मायनर म्हणता येणार नाही. जे कोणी आरोपी आहेत, त्यांचे धागेदोरे पोलिसांनी ओळखलेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “महाराष्ट्रातून जे ऑपरेट करतात, त्यांना अटक केली आहे. जे राज्याबाहेरुन, देशाबाहेरुन ऑपरेट करणारे आहेत, त्यांना शोधून काढू. त्यांच्यावर कारवाई होईल” असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘हल्ला करणारे डरपोक लोक आहेत, त्यांचा वार नाकाम केला जाईल’ असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
