रुपाली चाकणकरांना चित्रपटाची भीती का? त्यांनी काही केलंय का? ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या दिग्दर्शकाचा थेट सवाल

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' या चित्रपटाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता रुपाली चाकणकरांनी त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि वैयक्तिक शैलीचा परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकरांना चित्रपटाची भीती का? त्यांनी काही केलंय का? महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सच्या दिग्दर्शकाचा थेट सवाल
रुपाली चाकणकर आणि दिपाली सय्यद
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 15, 2026 | 1:52 PM

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात आणि मनोरंजनविश्वात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या नावाचा, फोटोचा आणि वैयक्तिक शैलीचा परवानगीशिवाय वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासमोरही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘रुपाली चाकणकरांना या चित्रपटाची भीती का वाटते? त्यांनी काही केलंय का?’, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच चित्रपटाच्या सेन्सॉर प्रक्रियेदरम्यान आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

‘चाकणकरांनी चित्रपटाला विरोध करू नये, पाठिंबा द्यावा’

टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, हा चित्रपट समाजाचं प्रबोधन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात येत आहे. भोंदूगिरी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्यासाठी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. किमान 70 टक्के गोष्टी थांबतील, असा आमचा विश्वास आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी चित्रपटाच्या वाटेत अडथळे निर्माण करू नयेत. उलट त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा द्यावा, अशी माझी विनंती असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

Loading...

पुढे ते म्हणाले, “जर त्या या चित्रपटाला विरोध करत असतील, तर त्यामागे त्यांची काही भीती आहे का? त्यांनी काही केलंय का? तसं असेल तर त्यांनी बोलावं. कोणत्याही भोंदूगिरीला सर्वसामान्य नागरिकांनी आणि महिलांनी बळी पडू नये, यासाठी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत.”

‘चित्रपट काल्पनिक, ट्रेडमार्कचा प्रश्नच येत नाही’

रुपाली चाकणकर यांनी नाव, फोटो आणि त्यांच्या वैयक्तिक शैलीच्या ट्रेडमार्क नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावर बोलताना स्वरूप सावंत यांनी चित्रपट काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं. चित्रपटातील भूमिकेने साडी आणि मंगळसूत्र असा साधा लूक केला आहे. साडी कोणीही नेसू शकतं. त्यात कोणताही विशेष लूक तयार केलेला नाही. त्यामुळे ट्रेडमार्कचा प्रश्नच येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

सेन्सॉर बोर्डावर दबावाचा आरोप

या संपूर्ण प्रकरणात सेन्सॉर बोर्डाच्या प्रक्रियेबाबतही स्वरूप सावंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे चित्रपट प्रमाणपत्रासाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यास उशीर झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यावेळी बोर्डातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी रागाने संवाद साधल्याचा दावा त्यांनी केला. “आमच्यावर दबाव आहे. रुपाली चाकणकर तीन दिवसांपासून आमच्या ऑफिसला येऊन बसल्या आहेत. त्यांची तुमच्याविरोधात तक्रार आहे,” असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांवर रुपाली चाकणकर यांची भूमिका काय असेल आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us