नवीन घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली फ्रेम लावली तेव्हा..; गौरव मोरेकडून भावना व्यक्त

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या नवीन घराविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. गौरवने नुकतंच स्वत:चं घर घेतलं असून त्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

नवीन घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पहिली फ्रेम लावली तेव्हा..; गौरव मोरेकडून भावना व्यक्त
Gaurav More
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 21, 2026 | 1:09 PM

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे यानं नुकतंच स्वत:चं घर घेतलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचा संघर्ष, प्रवास आणि कष्ट सर्वांनी जवळून पाहिलं होतं, त्यामुळे गौरवने जेव्हा हक्काचं घर घेतलं, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याच्यासाठी पोस्ट लिहिल्या होत्या. गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घराचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या घराच्या मोठ्या पाटीवर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असंच नाव त्याने लिहिलं आहे. त्यामुळे हे फोटो आणखीनच चर्चेत आले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने नवीन घर घेतल्यानंतरची एक खंत बोलून दाखवली.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गौरव म्हणाला, “मी आधीच ठरवलं होतं की जेव्हा हे घर बनेल तेव्हा माझे गुरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची फ्रेम मी घरात सर्वांत आधी लावणार. जेव्हा ती फ्रेम लावली तेव्हा माझं घर भरल्यासारखं वाटलं. आमच्यासाठी एकंदर हा भावनिक क्षण होता. कारण 2015 मध्ये माझे बाबा वारले आणि आता मी जे काही मिळवतोय, ते पहायला बाबा नाहीत. मला राहून राहून एकच गोष्ट वाटत होती की, आज हे सगळं बघायला बाबा हवे होते. आपलं आज सगळं चांगलं होतंय, मी घर घेतलं, पण ते बघायला आज बाबा नाहीत. आमच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट वाटलं. कारण बाबांचंही ते स्वप्न होतं. अखेर मी ते पूर्ण केलं. पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते.”

ताडपत्रीच्या घरापासून ते स्वत:चं मोठं घर बनवण्यापर्यंतचा गौरव मोरेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. करिअरच्या सुरुवातील गौरवला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी 100 रुपयांत सर्व खर्च भागवायचो. प्रवास किंवा ऑडिशन्सला जाण्यासाठीचा खर्च मला परवडायचा नाही. मला सुरुवातीला फोनसुद्धा माहीत नव्हता. बऱ्याच काळानंतर मी की-पॅडवाला फोन खरेदी केला होता. मुंबईतल्या पवई फिल्टरपाडा या झोपडपट्टीत मी लहानाचा मोठा झालो. वस्तूंचं मूल्य काय असतं, हे मला तिथे राहून योग्यरित्या समजलं होतं. आता तिथल्या लोकांना माझ्यामुळे एक ओळख मिळाल्याचं ते सांगतात. अशा ठिकाणी मी वाढलो, याचा मला अभिमान आहे. कधीकधी प्रसिद्धी तुम्हाला तुमचं मूळ विसरायला लावते. पण मी ते कधीच विसरणार नाही. मी कितीही मोठा स्टार झालो तरी मी कुठे जन्माला आलो आणि लहानाचा मोठा झालो, हे कधीच विसरणार नाही.”

Follow Us