‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘आमने-सामने’ नाटकात वर्णी, नाना पाटेकरांसोबतही केलंय काम; केतकीच्या जागी दिसणार ‘ही’ अभिनेत्री

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता 'आमने सामने' नाटकात रोहन गुजरच्या जागी झळकणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याची आमने-सामने नाटकात वर्णी, नाना पाटेकरांसोबतही केलंय काम; केतकीच्या जागी दिसणार ही अभिनेत्री
| Updated on: Oct 28, 2026 | 5:22 PM

सध्या ‘आमने सामने‘ हे नाटक चर्चेचा विषय ठरलं आहे. या नाटकातून केतकी पालव आणि रोहन गुजर यांची एक्झिट झाली आहे. मानधनवाढ मागितल्यामुळे निर्मात्यांनी नाटकातून काढून टाकल्याचा आरोप रोहन आणि केतकी यांनी केला. त्यानंतर नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर देत निर्णयामागचं कारण सांगितलं आहे. तिसऱ्यांदा मागितलेली मानधनवाढ परवडणारी नसल्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, असं लीना भागवत यांनी सांगितलं. अशातच आता रोहन गुजर आणि केतकी पालव यांच्या जागी ‘आमने सामने‘ नाटकात कोण काम करणार याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. रोहन गुजरच्या जागी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ फेम अभिनेता झळकणार आहे. तसेच केतकीच्या जागी अभिनेत्री ऋतुजा धारपची वर्णी लागली आहे.

‘आमने सामने‘ या नाटकातून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ फेम तेजस राऊत मराठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. हे तेजसचं पाहिलं व्यावसायिक नाटक आहे. यापूर्वी अभिनेत्यानं सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यानं नाना पाटेकर यांच्यासोबत ‘वनवास‘ या सिनेमात काम केलंय. ‘आमने सामने‘ नाटकातील भूमिकेविषयी सांगताना तेजस म्हणाला की, ‘माझं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, याचा मला आनंद आहे. ‘आमने सामने’चा फॉर्म थोडा वेगळा असल्यानं दडपणही आहे. रंगभूमीवर संवाद म्हणण्याची तालीम कलाकार करत असतो. मात्र नाटकामध्ये मला प्रेक्षकांशी संवाद साधायचा आहे. त्याची सवय होईपर्यंत थोडंसं दडपण राहील.’ मुंबई टाइम्ससोबत साधलेल्या संवादात तेजस राऊतनं प्रतिक्रिया दिली.

Loading...

 

तेजस पुढे म्हणाला की, ‘नाटक करायला फार ऊर्जा आणि हिंमत गरजेची असते, हे अलीकडे तालमीदरम्यान मला जाणवलं. एकांकिकेतल्या कामाचा फायदा मला वेब सीरिज-चित्रपटासाठी झाला. आता तिथल्या कामाचा फायदा रंगभूमीवर काम करताना होतोय. रंगभूमी आणि रसिक प्रेक्षक रंगकर्मीना कायम सांभाळून घेतात. मलाही ते सांभाळून घेतील, याची खात्री आहे.’

अभिनेत्री ऋतुजा धारप म्हणाली की, ‘पुन्हा रंगभूमीकडे वळताना फार छान वाटतंय. लीना भागवत, मंगेश कदम यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करताना त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतोय. चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा प्रत्येक माध्यमाची वेगळी आव्हानं असतात. नाटकात एखाद्याही चुकीला जागा नसते. नाही तर प्रयोग फसतो. मी न चुकण्याची विशेष काळजी घेत आहे.’

दरम्यान, तेजस राऊतच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं नाना पाटेकर यांच्यासोबत ‘वनवास‘ या सिनेमात काम केलंच आहे. पण, त्याचबरोबर त्यानं नानांसोबत ‘संकल्प‘ या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आता तेजसला रंगभूमीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us