महेश मांजरेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट; महत्त्वपूर्ण अपडेट समोर

महेश मांजरेकर यांनी आज (सोमवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता.

महेश मांजरेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट; महत्त्वपूर्ण अपडेट समोर
महेश मांजरेकर, राज ठाकरे
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2025 | 1:28 PM

दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्यापूर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडणार आहे. याच कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी मांजरेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. 2009 मध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.

आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 31 ॲाक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी भाषा आणि माणसाचा मुद्दा म्हटला की राज ठाकरे यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. काही दिवसांपूर्वी अभिजीत पानसे यांनीसुद्धा त्यांच्या आगामी चित्रपटासंदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचं ट्रेलर त्यांच्या हस्ते व्हावं, यासाठी आमंत्रण द्यायला मांजरेकरांनी भेट घेतली आहे.

चित्रपटाची कथा – पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली असून प्रस्तुती झी स्टुडिओजची आहे. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतंय.