Shahu Chhatrapati: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर बिग बजेट मराठी चित्रपट; कोण साकारणार भूमिका?

| Updated on: Jun 22, 2022 | 2:29 PM

डॉ. जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या 'शाहू छत्रपती' चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज करणार आहेत.

Shahu Chhatrapati: राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर बिग बजेट मराठी चित्रपट; कोण साकारणार भूमिका?
या चित्रपटाचे नाव आहे 'शाहू छत्रपती'
Image Credit source: Tv9
Follow us on

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या (Rajarshi Shahu Maharaj) जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘शाहू छत्रपती’ (Shahu Chhatrapati). ब्रिटीश राजसत्तेच्या काळात रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणारे, सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचे जीवनकार्य या चित्रपटाद्वारे (Marathi Movie) जनसामान्यांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डॉ. जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज करणार आहेत. विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. यंदाचे वर्ष हे राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. राजर्षी शाहूंनी त्यांच्या कारकिर्दीत काळाच्या पुढे असणारे जनकल्याणाचे असंख्य निर्णय घेतले आणि राबवले. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, स्त्रिया, दलित अशा समाजघटकांसाठी राजर्षी शाहूंनी भरीव कार्य केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे अशा अग्रगण्य समाजसुधारकांना राजर्षी शाहूंनी सर्वार्थाने सहाय्य केले. राजर्षी शाहूंचा गौरवशाली इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना या भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर भाषांमध्येही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. इतर ऐतिहासिक चरित्रपटांहून वेगळ्या कालखंडात घडणारी ही कथा असून याद्वारे शाहू महाराजांच्या काळातील महाराष्ट्र मोठ्या पडद्यावर पहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटाच्या अधिक तपशीलाबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास ‘शाहू छत्रपती’ या बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून विविध भाषांतून देश आणि जगभरातील लोकांना पहायला मिळणे केवळ मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी जनासाठी आनंदाची बाब आहे.

हे सुद्धा वाचा