‘माझी गाडी मोठी होती, सर्वांना वाटलं मोठा सुपरस्टार असेल’, विनानिमंत्रण अमिताभ यांच्या पार्टीत घुसलेला हा गायक
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत विनानिमंत्रण पोहोचला होता हा लोकप्रिय गायक. बिग बींच्या एका मेसेजने जिंकलेले मन. कोण आहे तो?

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मीका सिंह याने नुकताच ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांच्या घरी होणाऱ्या भव्य दिवाळी पार्टीत सहभागी होण्याचे मीकाचे स्वप्न होते. एकदा तर तो कोणतेही निमंत्रण नसताना मोठी गाडी घेऊन पार्टीत पोहोचला होता. मात्र, आपण विनानिमंत्रण आल्याची जाणीव होताच त्याने तेथून निघण्याचा निर्णय घेतला.
मीका सिंहने सांगितले की, दिवाळीच्या काळात तो अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरून जायचा. बिग बींच्या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहत असत. या पार्टीत सहभागी होण्याची त्याचीही इच्छा होती.
विना निमंत्रण पार्टी गेला होता मीका सिंह
एकदा मीकाने आपल्या मोठ्या गाडीच्या मदतीने पार्टीत प्रवेश मिळवला. त्याने गाडीच्या काचा काळ्या ठेवल्या होत्या आणि डोळ्यांवर चष्माही घातला होता. गेटवर हॉर्न वाजवल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी एखादा मोठा सुपरस्टार आला असावा असे समजून गेट उघडले. त्यामुळे मीका थेट पार्टीच्या परिसरात पोहोचला.
मात्र, काही वेळातच आपण कोणत्याही निमंत्रणाशिवाय पार्टीत आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने गाडी मागे घेतली आणि तेथून निघून जाणे पसंत केले. या घटनेनंतर अमिताभ बच्चन यांनी मीकाला संदेश पाठवला. पुढच्या वेळी थेट भेटायला ये असे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांच्या या प्रेमळ वागणुकीने मीका प्रभावित झाला. त्यांच्या याच स्वभावाचे त्याने कौतुक केले.
View this post on Instagram
सणांमध्ये आपले घर सर्वांसाठी खुले असावे
दरम्यान, मीकाचा हा किस्सा ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सणांच्या निमित्ताने आपल्या घरी पाहुण्यांचे स्वागत करण्याच्या परंपरेविषयी सांगितले. या परंपरेचे श्रेय त्यांनी पत्नी जया बच्चन यांना दिले. दिवाळी असो, होळी असो किंवा अन्य कोणताही सण, आपले घर सर्वांसाठी खुले असावे अशी जया बच्चन यांची भूमिका असल्याचे अमिताभ यांनी सांगितले.
मीका सिंहचा हा किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत असून, अमिताभ बच्चन यांच्या दिलदार स्वभावाचीही पुन्हा एकदा झलक पाहायला मिळाली.
