
आई ही जगातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहे. तिच्याशिवाय कोणताही दिवस सुरू होत नाही आणि इतर कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही. आईसाठी असलेल्या या खास दिवशी आम्ही बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आपल्या मुलांचं संगोपन करण्यास आपण पूर्णपणे सक्षम असल्याचं सिद्ध केलंय. नीना गुप्तापासून उर्वशी ढोलकिया पर्यंत ग्लॅमर वर्ल्डच्या बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावर तर उत्तम कामगिरी केलीच मात्र पडद्यामागील आपली जबाबदारी चांगली पार पाडली.

रवीना टंडन : अनिल थडानीशी लग्न करण्यापूर्वी रवीना टंडननं दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. 1994 साली तिनं पूजा आणि छायाला दत्तक घेतलं. दोन्ही मुली आता विवाहित आहेत. रवीनाने आपल्या दोन्ही मुलींना चांगल्या प्रकारे वाढवलं आणि खऱ्या आईप्रमाणे त्यांची पूर्ण काळजी घेतली. दोन्ही मुलींना दत्तक घेतल्याच्या दहा वर्षानंतर रवीनानं 2004 मध्ये अनिलशी लग्न केलं. त्यांना आता राशा थडानी आणि मुलगा रणबीर थडानी ही दोन मुलं आहेत.

उर्वशी ढोलकिया : कसौटी जिंदगी की सीरियल फेम कोमोलिका उर्फ उर्वशी ढोलकियाचं लग्न अगदी लहान वयात झालं होतं. लग्नानंतर त्यांना क्षितीज आणि सागर ढोलकिया ही दोन मुले झाली. घटस्फोटानंतर एकट्या उर्वशीनं तिच्या दोन मुलांची जबाबदारी घेतली आणि त्यांचं संगोपन केलं. उर्वशीला तिच्या व्यावसायिक जीवनाबरोबरच वैयक्तिक जीवनातही चांगलं सामंजस्य लाभलं आणि आज ती एक यशस्वी अभिनेत्री सोबतच एक यशस्वी आई आहे.

सुष्मिता सेन : कारकिर्दीच्या शिखरावर सुष्मिता सेननं जीवनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 2000 साली तिनं मुलगी रेनीला आणि त्यानंतर 2010 मध्ये मुलगी अलिशाला दत्तक घेतलं. सुष्मिताचं दोन्ही मुलींसोबत बॉन्डिंग उत्तम आहे. ती अनेकदा आपल्या दोन मुलांसोबत फोटो शेअर करत असते. सुष्मिताचा बॉयफ्रेन्ड रोहमन शालही रेनी आणि अलिशाच्या खूप जवळ आहे.

नीना गुप्ता : नीना गुप्ता या अविवाहित आई असल्याची कहाणी अनेकांना माहिती आहे. वेस्ट इंडियन क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्सला निनासोबत मसाबा गुप्ता नावाची एक मुलगी आहे. नीना आणि विव्हियन यांनी लग्न केलं नाही, मात्र या दोघांनीही आपल्या मुलीला एकत्र वाढवलं. आज मसाबा एक सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ती आपल्या आईचं नाव रोशन करतेय. हे स्पष्टपणे दिसून येतं की मसाबाच्या संगोपनात नीनाने कोणतीही कसर सोडली नाही.

मलायका अरोरा : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान आहे. अरबाजबरोबर घटस्फोटानंतर अरहान आई मलायकासोबत राहिला. मलायकानं मुलाला लागणारं सर्व काही दिलं.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचे दोन लग्न झाले होते आणि दोनही लग्न जास्त काळ चालले नाही. पती राजा चौधरीशी लग्नानंतर श्वेताला मुलगी झाली. पण घरगुती हिंसाचारामुळे श्वेतानं लवकरच मुलीला राजाकडून ताब्यात घेतलं. विभक्त झाल्यानंतर श्वेतानं मुलगी पलकला एकटीनं वाढवलं.तिनं पालकचं चांगलं संगोपन केलं. काही काळानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं आणि त्यांना मुलगा रेयांश झाला. मात्र, श्वेताचे अभिनवसोबतचे संबंध फार काळ चालले नाहीत आणि आता ते दोघंही वेगळे राहत आहेत. श्वेता मुलांसह म्हणजेच पलक आणि रेयांशसोबत राहते.

अमृता सिंग : घटस्फोटानंतर सैफ अली खानची पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता सिंगनंही आपली दोन मुलं सारा अली खान आणि इब्राहिमची काळजी घेतली. जरी तिला सैफनं आर्थिकदृष्ट्या मदत केली असली तरी मुलांमध्ये नैतिक आणि व्यावहारिक आधाराच्या बाबतीत अमृताचे मोठं योगदान दिलं आहे. घटस्फोटानंतर अमृतानं दोन्ही मुलांचा ताबा घेतला आणि त्यांना आपल्याकडे ठेवले.