
शेखर कपूर दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट 1987 मध्ये प्रदर्शित झाला होता. या ब्लॉकबस्टर चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर दिग्गज अभिनेते अमरीश पुरी यांनी या चित्रपटा ‘मोगॅम्बो’ची भूमिका साकारली होती. मोगॅम्बो हा खलनायक आजही प्रेक्षकांमध्ये अमर आहे. आपल्या दमदार अभिनय कौशल्याने अमरीश पुरी यांनी त्या भूमिकेला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी निर्मात्यांनीही त्याकाळी बराच पैसा खर्च केला होता. मोगॅम्बोचा कॉस्च्युम बनवण्यासाठी सात दिवस लागले होते आणि डिझायनरनेही त्यासाठी तगडं मानधन घेतलं होतं.
‘मिस्टर इंडिया’मधील खलनायक मोगॅम्बोचा लूक प्रसिद्ध डिझायनर माधव अगस्तीने डिझाइन केला होता. या कॉस्च्युमबद्दल त्यांनी ‘स्टिचिंग स्टारडम: फॉर आइकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ या आपल्या पुतस्कार सविस्तर सांगितलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं, “चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर आणि निर्माते बोनी कपूर माझ्या दुकानात आले होते. त्यांनी मला सांगितलं की अशा विलेनचा कॉस्च्युम तयार करायचा आहे. त्या कॉस्च्युमला परदेशी हुकूमशाह आणि देशी जमीनदार या दोघांचा अंश असला पाहिजे, असं त्यांनी मला सांगितलं होतं.”
“मोगॅम्बोच्या कॉस्च्युमसाठी आम्ही परदेशी वृत्तपत्रे, मासिके आणि चित्रपटांच्या इतिहासाविषयीची पुस्तके यांवर खूप अभ्यास केला. त्यातून कात्रणं काढली आणि अखेर मोगॅम्बोच्या वेशभूषेचा डिझाइन सेट केला. त्यासाठी काळ्या रंगाच्या कोटवर गोल्डन मोनोग्राम प्रिंटचा कोट, लांब फ्रीलवाला शर्ट आणि बूटसारखे शूज यांचा वापर केला. अशा प्रकारे अमरीश पुरी यांचा मोगॅम्बोचा कॉस्च्युम तयार झाला”, असं त्यांनी म्हटलंय.
मोगॅम्बोचा कॉस्च्युम बनवण्यासाठी सात दिवस लागले आणि त्यासाठी जवळपास 25 हजार रुपये फी घेण्यात आली होती. परंतु डिझाइनरचं काम पाहून बोनी कपूर खूपच खुश झाले होते. त्यामुळे त्यांनी बक्षीस म्हणून आणखी 10 हजार रुपये दिले. अशा पद्धतीने मोगॅम्बोचा कॉस्च्युम बनवण्यासाठी एकूण 35 हजार रुपये खर्च आला होता.
या पुस्तकात माधव अगस्ती यांनी अमरीश पुरी यांच्यासोबतचाही किस्सा सांगितला आहे. “अमरीश पुरी यांना लूक टेस्टदरम्यान जेव्हा तो कॉस्च्युम देण्यात आला होता, तेव्हा त्यात ते खूपच वेगळे आणि जबरदस्त दिसत होते. त्यांनाही तो ड्रेस खूप आवडला होता. तो कॉस्च्युम घातल्यानंतर त्यांच्या तोंडून एकच डायलॉग निघाला, मोगॅम्बो खुश हुआ”, असं त्यांनी लिहिलंय.