Shilpa Rao : शिल्पा रावचा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अपमान? पती रितेश कृष्णन संतप्त, आयोजकांना सुनावले खडे बोल!

Shilpa Rao Mic Cut Off Controversy : मुंबईत एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायिका शिल्पा रावचा माईक अचानक बंद केल्याचं प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे.याच मुद्यावरून आता गायिकेचा पती, रितेश कृष्णन चांगलाचा संतापला आहे. आयोजकांची ही कृती अत्यंत लाजिरवाणे आणि स्वार्थी असल्याचे सांगत तिच्या पतीने सोशल मीडियावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Shilpa Rao : शिल्पा रावचा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अपमान? पती रितेश कृष्णन संतप्त, आयोजकांना सुनावले खडे बोल!
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 3:05 PM

मुंबईतील एका मोठ्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायिका शिल्पा रावसोबत घडलेल्या प्रकारामुळे सध्या मनोरंजनविश्वात मोठी चर्चा सुरू आहे. स्टेजवर परफॉर्मन्स दिल्यानंतर चाहत्यांचे आभार मानत असतानाच तिचा मायक्रोफोन आणि ऑडिओ सिस्टीम बंद करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शिल्पा रावचा पती रितेश कृष्णन चांगलाच संतापला असून त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पत्नीला स्टेजवर अशा परिस्थितीचा सामना करताना पाहणे आपल्यासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचे त्याने सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितलं.

नेमकं काय घडलं कॉन्सर्टमध्ये?

Loading...

शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टच्या दहाव्या वर्धापनदिनाच्या सेलिब्रेशनदरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्याचं सांगितलं जातं. या कार्यक्रमात शिल्पा राव आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. प्रेक्षकही मंत्रमुग्ध होऊन तीचं गाणं ऐकत होते. परफॉर्मन्स पूर्ण झाल्यानंतर ती चाहत्यांचे आभार मानत असताना अचानक तिचा मायक्रोफोन आणि ऑडिओ सिस्टीम बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर लगेचच अन्य कलाकारांना स्टेजवर बोलावण्यात आले. या प्रकारामुळे शिल्पा रावला पुरेसा वेळ न देता तिचा परफॉर्मन्स संपवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियावरही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

पती रितेश कृष्णनने आयोजकांना धरले धारेवर

या घटनेनंतर शिल्पा रावचा पती रितेश कृष्णन याने 25 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. पत्नीला स्टेजवर अशा प्रकारे वागणूक मिळताना पाहणे आपल्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण असल्याचे त्याने नमूद केलं. रितेश यांच्या म्हणण्यानुसार, त्या क्षणी त्याला प्रचंड राग, निराशा आणि असहाय्यता जाणवत होती. या घटनेने आपल्याला आतून हादरवून सोडल्याचेही त्याने आपल्या पोस्टमधून व्यक्त केले.

 

तसेच आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्याने असा आरोप केला की, घडलेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपली चूक झाकण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. एखाद्या कलाकाराला आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही क्षणही देण्यात आले नाहीत, ही बाब त्यांना अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद वाटली.

आपल्या पोस्टच्या शेवटी रितेश कृष्णननेनी शिल्पा रावबद्दलचा अभिमान व्यक्त केला. या कठीण प्रसंगात आपण पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्याने स्पष्ट केलं.

आयोजकांच्या स्पष्टीकरणानंतरही वाद कायम

या प्रकरणावरून वाद वाढल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यानुसार, कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा बराच उशिराने सुरू होता. तसेच, कार्यक्रमस्थळाशी संबंधित वेळेच्या मर्यादा आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. मागील कलाकारांच्या सादरीकरणांमध्ये झालेल्या विलंबामुळे संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक बिघडले होते, असा युक्तिवादही आयोजकांकडून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us