प्रभू रामाच्या भूमिकेत मुस्लिम अभिनेता, दिग्दर्शकही मुस्लिम; 29 वर्षांपूर्वी या मालिकेने घातला होता धुमाकूळ

Doordarshan 90s popular shows : डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली ही मालिका हनुमानाचा जन्म, त्यांचं बालपण, प्रभू रामांप्रती असलेली भक्ती आणि राम-रावण युद्धापर्यंतचा प्रवास यावर आधारीत होती. तब्बल 178 भागांची ही मालिका 2008 मध्ये सोनी टीव्हीवरही पुन्हा प्रसारित झाली होती.

प्रभू रामाच्या भूमिकेत मुस्लिम अभिनेता, दिग्दर्शकही मुस्लिम; 29 वर्षांपूर्वी या मालिकेने घातला होता धुमाकूळ
Doordarshan 90s popular shows
Image Credit source: social media
| Updated on: Nov 16, 2026 | 12:16 PM

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं बजेट असल्याचं सांगितलं जाणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत या सिनेमाने 1 हजार 300 कोटींची कमाई केली असून, त्याची घोडदौड अजूनही सुरू आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा वेळी रामायण आणि पौराणिक कथांवर आधारित जुन्या मालिकांची आठवण होणं स्वाभाविक आहे. मात्र, 90 च्या दशकात टीव्हीवर एक अशी मालिका आली होती, जिने आपल्या वेगळ्याच कारणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या मालिकेचं दिग्दर्शन एका मुस्लिम दिग्दर्शकाने केलं होतं, तर प्रभू रामाची भूमिका साकारणारा अभिनेताही मुस्लिम होता. एवढंच नाही, तर दिवंगत अभिनेते इरफान खान यांचाही या मालिकेत महत्त्वाचा रोल होता.

1997 मध्ये टीव्हीवर गाजली जय हनुमान

आपण बोलतोय 1997 मध्ये डीडी नॅशनलवर सुरू झालेल्या ‘जय हनुमान’ या मालिकेबद्दल. अभिनेते आणि दिग्दर्शक संजय खान यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. हनुमानाचं जीवन आणि प्रभू रामाप्रती असलेली त्यांची अढळ भक्ती हा मालिकेचा विषय होता. विशेष म्हणजे, सिराज मुस्तफा खान यांनी यात प्रभू रामाची भूमिका साकारली होती.

Loading...

इरफान खान, रवी किशनसह दिग्गज कलाकारांची फौज

या मालिकेची स्टारकास्टही तितकीच खास होती. दिवंगत अभिनेते इरफान खान यांनी महर्षी वाल्मीकींची भूमिका साकारली होती. तर अभिनेता रवी किशन भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसले होते. राज प्रेमी यांनी हनुमानाची मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

हनुमानाच्या जन्मापासून राम-रावण युद्धापर्यंतची कथा

तब्बल 178 भागांच्या या मालिकेत हनुमानाचा जन्म, बालपणीच्या खोड्या, त्यांच्यातील विलक्षण शक्ती आणि प्रभू रामाप्रती असलेली भक्ती दाखवण्यात आली होती. पुढे राम-हनुमान भेट, सीतेचा शोध, समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश आणि राम-रावण युद्धापर्यंतचा प्रवासही मालिकेत पाहायला मिळाला.

सोनी टीव्हीवरही झालं होतं प्रसारण

डीडी नॅशनलवर लोकप्रिय झालेल्या या मालिकेचं 2008 मध्ये सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरही पुनःप्रसारण करण्यात आलं. दमदार कलाकार, वेगळी निर्मिती आणि हनुमानाच्या जीवनाची रंजक मांडणी यामुळे ‘जय हनुमान’ आजही 90 च्या दशकातील लोकप्रिय पौराणिक मालिकांपैकी एक म्हणून आठवली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us