Naseeruddin Shah : पहिलं लग्न का मोडलं? पहिली पत्नी परवीनच्या बाबतीत काय चुकलं, नसीरुद्दीन शाहंकडून प्रामाणिक कबुली
Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांच्याबद्दल एक आपुलकीची भावना आहे. 1982 साली त्यांचं लग्न झालं. पण फार कमी लोकांना माहितीय की, नसीरुद्दीन शाह यांचं हे दुसरं लग्न आहे.

बॉलिवूडमध्ये अशा काही मोजक्या जोड्या आहेत, ज्यांना मेड फॉर इच अदर म्हटलं जातं. नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह अशाच जोडप्यांपैकी एक आहे. प्रामाणिकपणा, परस्परांबद्दल आदर आणि दीर्घकाळ एकमेकाला दिलेली साथ यामुळे प्रेक्षकांमध्ये नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांच्याबद्दल एक आपुलकीची भावना आहे. 1982 साली त्यांचं लग्न झालं. पण फार कमी लोकांना माहितीय की, नसीरुद्दीन शाह यांचं हे दुसरं लग्न आहे. नसीरुद्दीन शाह यांचं पहिलं लग्न परवीन मुराद यांच्यासोबत झालं होतं. नसरुद्दीन शाह यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगी आहे ‘हीबा’. आपल्या आत्मचरित्रात नसीरुद्दीन शाह यांनी आयुष्याच्या या पानाबद्दल खुलासा केला आहे.
परवीन मुराद यांच्यासोबत लग्न झालं, त्यावेळी मी नवरा म्हणून भावनिक दृष्ट्या अपरिपक्व होतो तसचं मुलीकडेही दुर्लक्ष केल्याच त्यांनी कबूल केलं. 1960 साली 19 वर्षांचे नसीरुद्दीन शाह अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिकत होते. थिएटरची त्यांना प्रचंड आवड होती. नसीरुद्दीन यांना अभिनयात कारकिर्द घडवण्याला कुटुंबातून विरोध होता. परवीन त्यावेळी 34 वर्षांच्या होत्या. विद्यापीठात त्या मेडिकल इंटर्न होत्या. नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनेता बनण्याच्या स्वप्नाला कुटुंबाचा विरोध असला तरी परवीन यांची भक्कम साथ होती. माझ्या स्वप्नांवर कोणाचा तरी विश्वास होता, हीच परवीन यांची गोष्ट नसीरुद्दीन यांना भावली. ते तिच्या प्रेमात पडला. दोघांच्या वयात तब्बल 15 वर्षांच अंतर होतं, तरीही त्यांनी लग्न केलं.
मुराद कुटुंबाच्या मनातली भिती खरी ठरली
या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून विरोध झाला. कारण परवीन घटस्फोटीत होत्या. त्यांच्या पदरात पहिल्या लग्नापासून दोन मुलं होती. नसीरुद्दीन तरुण असल्याने ते कधीही परवीन यांना सोडून जातील अशी भिती मुराद कुटुंबाला होती. मुराद कुटुंबाला त्यांच्या नात्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे म्हणून नसीरुद्दीन यांनी आश्वासन दिलेलं की, जर घटस्फोट झाला तर मी नुकसान भरपाई देईन. पण मुराद कुटुंबाच्या मनात जी भिती होती, ती खरी ठरली.
नात्यातील दरी आणखी वाढली
लग्नानंतर वर्षभराने त्यांच्या कुटुंबात हीबाचं आगमन झालं. बाळाच्या आगमनामुळे खरंतर त्यांचं नातं भक्कम झालं पाहिजे होतं. पण त्यांच्या नात्यातील दरी आणखी वाढली. आत्मचरित्रात नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या चुकांची कबुली दिली आहे. प्रेग्नेसीच्या काळात पत्नीला साथ देण्यासाठी भावनिक परिपक्वता नसल्याचं नसीरुद्दीन शाह यांनी कबुली दिली.