नयनतारा-विग्नेशच्या सरोगसीची चर्चा होणार; तमिळनाडूच्या मंत्र्यांचे निर्देश

लग्नाच्या चार महिन्यांत नयनतारा-विग्नेश झाले जुळ्या मुलांचे आई-वडील

नयनतारा-विग्नेशच्या सरोगसीची चर्चा होणार; तमिळनाडूच्या मंत्र्यांचे निर्देश
Nayanthara and Vignesh Shivan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 10, 2022 | 7:56 PM

चेन्नई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी रविवारी चाहत्यांना सुखद धक्का दिला. नयनतारा आणि विग्नेश हे लग्नाच्या चार महिन्यांतच जुळ्या मुलांचे आई-वडील झाले. या दोघांनी सरोगसीद्वारे (surrogacy) जुळ्यांना जन्म दिल्याची चर्चा होती. मात्र काही कायदेतज्ज्ञांनी ही बाब निदर्शनास आणून दिली की भारतात जानेवारीपासून काही अपवाद वगळता सरोगसी बेकायदेशीर ठरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता तमिळनाडूचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम यांनी नुकतंच सांगितलं की, राज्य सरकार याप्रकरणी नयनतारा आणि विग्नेशकडून स्पष्टीकरण मागणार आहे.

नयनतारा आणि विग्नेशने 9 जून रोजी लग्न केलं. ‘नयन आणि मी, अम्मा आणि अप्पा झालो’, असं कॅप्शन देत विग्नेशने रविवारी सोशल मीडियावर जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट केले होते. त्याचसोबत या मुलांची नावंसुद्धा त्याने जाहीर केली होती.

या दोघांनी सरोगरीद्वारे जुळ्यांना जन्म दिल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तविला होता. गेल्या काही काळात बऱ्याच सेलिब्रिटींनी सरोगसीचा पर्याय निवडला. यामध्ये बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचाही समावेश होता.

यावर्षी जानेवारीपासून भारतात सरोगसी बेकायदेशीर ठरवली आहे. यात काही अपवाद आहेत. सोमवारी चेन्नईत एका पत्रकार परिषदेत तमिळनाडूचे आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम यांना नयनताराच्या सरोगसीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेलं जोडपं सरोगसीद्वारे गर्भधारणा करू शकतात का आणि वेळेचं काही बंधन आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री म्हणाले, “यासंदर्भात वैद्यकीय सेवा संचालनालयाला चौकशी करण्याचे आणि जोडप्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले जातील.”

नयनतारा आणि विग्नेश यांनी अद्याप सरोगसीसंदर्भात कोणतंही भाष्य किंवा खुलासा केला नाही. 2015 मध्ये या दोघांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी यावर्षी जून महिन्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.