Nivedita Saraf : …अन् त्यांच्या रूपाने मला माझी आई भेटली, निवेदिता सराफ यांनी सांगितला स्वामींच्या दर्शनाचा अनुभव
Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांनी नुकत्याच एका मुलाखतीत स्वामी भक्तीचा अनुभव सांगितला आहे.

मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची स्वामींवर अपार श्रद्धा आहे. याबद्दल काही अभिनेत्री मुलाखतींमध्ये सांगतात. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी स्वामी भक्तीचा अनुभव सांगितला आहे. पती अशोक सराफ यांच्यामुळे मी स्वामींची भक्ती करू लागले, असंही निवेदिता यांनी सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान निवेदिता सराफ म्हणाल्या की, ‘मी माझ्या पतीमुळे अशोकमुळे स्वामींची भक्ती करायला लागले. कारण त्या आधी मला त्यांच्याविषयी विशेष माहिती नव्हती. का कोण जाणे मला एकदा अशोकनी सांगितलं. जवळजवळ त्यांनी नॉनव्हेज वगैरे पण सोडलं होतं, ते सहा वर्ष स्वामींची भक्ती करत होते.’
निवेदिता सराफ यांनी सांगितला प्रसंग
‘एकदा मला वाटतं कुठल्यातरी चित्रिकरणाच्या दरम्यान ते सोलापूर परिसरात होते आणि ते म्हणाले, मी सहा वर्षांचं व्रत केलं त्याचं मी समर्पण करतोय. मला मंदिरात जाऊन पोथी वाचायची आहे. मंदिरात काकड आरतीच्या वेळेस किती गर्दी करते. त्यांचे एक निर्माते होते सतीश कुलकर्णी असे दोघेजण गेले. विश्वास बसणार नाही पण एक चिटपाखरु नव्हतं मंदिरात. ही सत्य परिस्थिती आहे. ते बसले त्यांनी पूर्ण अध्याय वाचला. नमस्कार केला आणि हळूहळू माणसं येऊ लागली. हे ऐकल्यानंतर म्हटलं मला तो ग्रंथ वाचायचा आहे. मग मी तो ग्रंथ घेतला. स्वामींच चरित्र वाचलं.’
‘मी स्वतः अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला खरंतर दोन मठ आहे, एक वटवृक्ष मठ आहे आणि एक समाधी मठ आहे. स्वामींनी खाली जाऊन समाधी घेतली मी तिकडे गेले मी सांगूच शकत नाही मला काय वाटलं. मला बोलताना सुद्धा भरून येतंय आणि ते हे अश्रू श्रद्धेचे आहेत. हे कुठल्याही दुःखाचे नाहीयेत किंवा आनंदाचे नाहीयेत. मी तिकडे गेले आणि त्या समाधी मठामध्ये जी कमान आहे चांदीची आणि ती त्या पायरीवर मी डोकं ठेवलं आणि मला असं वाटलं मी घरी आले. इथे माझं खरं श्रद्धास्थान आहे आणि मी घरी आले. मी खरंच वर्णन करू शकणार नाही की, मला त्या क्षणी तिकडे गेल्यावरती काय वाटलं. मी समाधी मठात नुसती बसून राहिले आणि स्वामींच्या खऱ्या वस्तू ठेवल्या आहेत, तिकडे सगळ्या त्यांच्या पादुका आहेत, ते अजानुबाहू होते. त्यांचा जो सदरा बघशील जवळजवळ सात फुटी उंच होते. कारण तो सदराच इतका लांब आहे. त्यांनी घातलेल्या त्यांच्या त्या खडावा वगैरे सगळ्या वस्तू तिकडे ठेवल्यात. त्याला स्पर्श केला आणि मला असं वाटलं की, मी माझ्या घरी आले. स्वामींच्या रूपाने आज मला माझी म्हणजे आई भेटली आणि मी घरी आले असं मला वाटलं आणि तेव्हापासून म्हणजे मी त्यांचं वाचू लागले.’ असं निवेदिता यांनी शेवटी सांगितलं. ‘अभिजात मराठी फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ बोलत होत्या.