Rahul Mahajan : पत्नींकडून मारहाणीचे आरोप, तीन घटस्फोट अन्…राहुल महाजनचं वैयक्तिक आयुष्य राहिलंय वादग्रस्त

Rahul Mahajan Personal Life : रिऍलिटी शोमध्ये दिसलेला राहुल महाजनचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे.

Rahul Mahajan : पत्नींकडून मारहाणीचे आरोप, तीन घटस्फोट अन्...राहुल महाजनचं वैयक्तिक आयुष्य राहिलंय वादग्रस्त
| Updated on: Nov 27, 2026 | 8:20 PM

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा राहुल महाजन कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमधून त्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा झाली. तीन घटस्फोट आणि पहिल्या दोन पत्नींकडून झालेल्या मारहाणीच्या आरोपांमुळे राहुल महाजनचं आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. त्याच्या नात्यांमधील चढ-उतार आणि वैवाहिक आयुष्यातील वादांमुळे तो कायम चर्चेत राहिला. जाणून घेऊया राहुल महाजनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल.

राहुल महाजन हा भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. मात्र, त्यानं वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. ‘बिग बॉस 2’, ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ आणि ‘बिग बॉस १४’ यांसारख्या कार्यक्रमांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Loading...

पहिलं लग्न आणि पत्नीचे मारहाणीचे आरोप

राहुल महाजननं २००६ मध्ये श्वेता सिंहसोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर त्यांच्या नात्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. श्वेतानं राहुलवर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचे आरोप केले होते. या आरोपांमुळे त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

स्वयंवरातून दुसरं लग्न, पण संसार टिकला नाही!

पहिल्या लग्नाच्या अपयशानंतर राहुल महाजन यांनी छोट्या पडद्यावरील ‘राहुल दुल्हनिया ले जाएगा’ या स्वयंवरावर आधारित रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात अनेक मुलींनी राहुलसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर डिंपी गांगुलीला त्यानं जोडीदार म्हणून निवडलं. 2010 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. मात्र, या लग्नानंतरही राहुलच्या आयुष्यातील अडचणी संपल्या नाहीत. लग्नाच्या काही महिन्यांतच डिंपीनं राहुलवर मारहाण आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. या प्रकरणामुळे मनोरंजनविश्वात मोठी चर्चा रंगली. काही काळानंतर दोघांमध्ये पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

तिसरं लग्न कझाकस्तानच्या मॉडेलशी

दोन लग्न मोडल्यानंतर राहुल महाजननं २०१८ मध्ये कझाकस्तानची मॉडेल नताल्या इलिना हिच्याशी तिसरं लग्न केलं. दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. काही काळ एकमेकांना जाणून घेतल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, नताल्या ही राहुलपेक्षा वयाने लहान होती. त्यांच्या लग्नाचीही त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. नताल्याशी लग्न केल्यानंतर राहुलनं आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. नताल्याला भारतीय संस्कृती आणि अध्यात्माची आवड असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. मात्र, हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. २०२३ मध्ये राहुल आणि नताल्या यांच्या घटस्फोट झाला.

आता अनेक वर्षानंतर राहुलनं चौथं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली असून लग्न करण्यापूर्वी लिव्ह–इनमध्ये राहणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us