CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर; काय होणार फायदा?
मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे नियमबद्ध व्यासपीठ आहे.

Mukhyamantri Sahayata Nidhi News: आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे नियमबद्ध व्यासपीठ आहे.
या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र संस्था आणि देणगीदार यांच्यात समन्वय साधता येतो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नव्या व्यासपीठाद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीला काय फायदा होणार?
या निर्णयामुळे निधी उभारण्याच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या व गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा पर्याय उपलब्ध होतो. त्यासोबतच मोठ्या देणगीदारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीचा वापर सामाजिककामांसाठी करण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो.
विशेषतः वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या निधीची गरज असलेल्या रुग्णांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कर्करोग, हृदयरोग, किडनी प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मेंदूविकार आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी अतिरिक्त निधी उभारण्यास मदत होऊ शकते. सीएसआर फंड देणाऱ्या कंपन्या, मोठे देणगीदार, फाउंडेशन, सामाजिक गुंतवणूकदार आणि इतर निधी पुरवठादार यांच्यापर्यंत पोहोचता येते.
तसेच नवीन देणगीदारांचा सहभाग वाढणार आहे. संस्थेच्या कार्याची माहिती व्यापक स्तरावर पोहोचल्यामुळे नवीन देणगीदार आणि सामाजिक क्षेत्रातील भागीदार मिळण्याची शक्यता वाढते. तसेच सामाजिक परिणाम मोजण्याची संधी निर्माण होत आहे. संस्थेने केलेल्या कामाचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, किती कुटुंबांचे जीवनमान सुधारले आणि किती सकारात्मक बदल घडले, हे मोजता येते.
