Pravin Tarde : 250 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली! दिवाळीनिमित्त प्रवीण तरडे यांची मोठी घोषणा, चाहत्यांकडून कौतुक
Pravin Tarde : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, यंदा गुंजण मावळ परिसरातील अनेक शेतकरी बांधवांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी प्रवीण तरडे यांनी पुढाकार घेतला. प्रवीण यांनी तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि मढेघाटाच्या पुढे असलेल्या गुंजण मावळ परिसरात शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमातून केवळ सणाचा आनंदच वाटण्यात आला नाही, तर प्रवीण यांनी तब्बल 250 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
प्रवीण तरडे म्हणाले की, गुंजण मावळ परिसरातील शेतकरी बांधवांसोबत यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण तरडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावात भेट दिली. ज्या शेतकरी बांधवांच्या योगदानातून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं, त्या भूमीतील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. पाऊस आणि पिकांच्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी राज देशमुख, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स आणि इतर सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यानं गावकऱ्यांसोबत दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
250 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
तसेच प्रवीण पुढे म्हणाले की, ‘माणुसकीची चळवळ’ या उपक्रमांतर्गत कैलास वाणी यांच्या पुढाकारानं गुंजण मावळ परिसरातील 250 मुलींच्या पुण्यातील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या परिसरातील कोणत्याही मुलीला शिक्षणासाठी पुण्यात येताना आर्थिक किंवा इतर मदतीची गरज भासल्यास तिला आवश्यक ते सहकार्य केलं जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, असं प्रवीण यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं.
शहरातील नागरिकांना केलं महत्त्वाचं आवाहन
या उपक्रमाच्या निमित्ताने प्रवीण यांनी शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आपल्या आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांना सणासुदीच्या काळात आवर्जून भेट द्यावी. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि गरजेच्या वेळी शक्य ती मदत करावी, असं प्रवीण यांनी सांगितलं.