
“हमारी सोसायटी में हम घाटी लोगों को नहीं रखते. सोसायटी का रुल है, घाटी लोगों को फ्लॅट नहीं देते हम”, या डायलॉगने ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ बोडकेची दमदार एण्ट्री होते. “घाटी म्हणजे माहितीये का कोण”, असं विचारत तो समोरच्या व्यक्तीला चपराक लगावतो. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमधील ‘घाटी’बद्दलचा डायलॉग सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. “घाटी म्हणजे घाटावर राहणारे, घाट म्हणजे या महाराष्ट्रात स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. या रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानीत तुम्ही राहू देणार नाही?” असा हा सिद्धार्थच्या तोंडी असलेला संवाद आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या या टीझरवर प्रेक्षकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे. ‘मराठी माणसाचा आवाज पुन्हा एकदा बॉक्स ऑफीसवर आपली छाप सोडणार,’ असं एकाने लिहिलं. तर ‘महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतारणार’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे, मराठी माणसाला स्वतःच्या महाराष्ट्रात हक्कासाठी लढावं लागतंय,’ असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आजवर कधीच दिसलं नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रखर रूप यात दिसणार असून मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्येचा मुद्दा, मराठी माणसांचं मुंबईतील स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक विषयांवर महाराजांचं भाष्य आणि कृती यातून बघायला मिळणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव न करता, आजच्या महाराष्ट्राशी आणि त्याच्या अनुत्तरित प्रश्नांशी संवाद साधत असल्याचे टीझरवरून कळतेय.