मुंबईतील ‘त्या’ हायप्रोफाईल कॉन्सर्टवर मोठं संकट? राज ठाकरेंच्या मनसेच्या एका पत्राने उडाली खळबळ!

मुंबईतील 'त्या' हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये नेमकं होतं तरी काय? ज्यामुळे कॉन्सर्ट आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलं असून, राज ठाकरेंच्या मनसेच्या एका पत्राने खळबळ उडाली आहे... तर जाणून घ्या मनसेने आंदोलनाचा इशारा का दिला आहे.

मुंबईतील त्या हायप्रोफाईल कॉन्सर्टवर मोठं संकट? राज ठाकरेंच्या मनसेच्या एका पत्राने उडाली खळबळ!
Raj Thackeray
| Updated on: Nov 27, 2026 | 12:47 PM

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याचं लवकरच मुंबईत कॉन्सर्ट होणार आहे. पण त्याआधीच कॉन्सर्ट वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दिलजीत याच्या होणऱ्या कॉन्सर्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विरोध केला आहे. मुंबईत दिलजीत याचा कॉन्सर्ट झालाच नाही पाहिजे, यासाठी मनसे आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी रेसकोर्स आणि NSCI डोम येथे होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं सेवन होण्याची दाट शक्यता आहे.. असा आरोप पक्षाने केला आहे. यासंदर्भात मनसे नेते शुक्रवारी म्हणजे आजच ताडदेव पोलिसांना एक पत्र देणार आहेत. तसेच, दिलजीत दोसांझचा कार्यक्रम रद्द न केल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

मनसेने असे आरोप केले आहेत की, महालक्ष्मी रेसकोस्ट आणि NSCI डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांची विक्री आणि सेवन उघडपणे केलं जात आहे. अशात, मनसेची अशी मागणी आहे ती, भविष्यात अशा जागांवर होणाऱ्या म्यूजिकल कॉन्सर्टवर बंदी घालण्यात यावी. याच बाबतीत मनसेकडून ताडदेव पोलिसांना एक पत्र देणार आहेत.

Loading...

पहिल्याच कॉन्सर्टमध्ये अनेकांची ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह

महालक्ष्मी रेसकोर्सवर कॉन्सर्टच्या नवीन सीझनच्या पहिल्याच कार्यक्रमात 12 जणांची ड्रग्ज सेवन केल्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली होती. यामुळे सर्वत्र खळबळ माजलेली. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ याच्या आगामी कॉन्सर्टपूर्वी मनसेने पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा वापर होण्याची शक्यता असल्याचा दावा मनसेने केला आहे. तसेच, कॉन्सर्टदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

‘ड्रग्जच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना’ – मनसे

गेल्या वर्षी याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ड्रग्सच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली. अशी मोठी घटना घडल्यानंतर देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने सुरू असल्याने मनसेने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कॉन्सर्ट संपल्यानंतर तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसतात, ज्याचा स्थानिक तरुणांवर चुकीचा परिणाम होत असल्याचं मनसेच्या पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भात पालकांनीही मनसेकडे तक्रार केली आहे. याशिवाय, कॉन्सर्टमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, ज्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो, असेही पक्षाने नमूद केले आहे.

मनसेकडून पोलिसांवरही व्यक्त केली नाराजी

मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे हे ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र देऊन भविष्यात महालक्ष्मी रेसकोर्स आणि NSCI डोम येथे म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणार आहेत. पोलिसांकडून अशा कार्यक्रमांना परवानगी आणि संरक्षण दिलं जात असल्यानेच आयोजकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही मनसेनं केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us