Ranbir Kapoor: रणबीर कपूरने नाकारला गणपतीचा प्रसाद, भडकले युजर्स; म्हणाले ‘अन् याला श्रीरामांची भूमिका..’
Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूरचा गणेशोत्सवादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये तो प्रसाद नाकारताना दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे भगवान श्रीरामाच्या भूमिकेतील त्याचा लूक आणि ‘जय जय राम’ गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे रणबीरचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेण्यास नकार देताना दिसत आहे. त्याने यामागे आपण डाएटवर असल्याचं कारण दिलं होतं. या व्हिडीओवरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आताचा नसून 2023 चा आहे. त्या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसतोय. दर्शन घेतल्यानंतर तो पापाराझींना मोदक वाटताना दिसतोय. त्याचवेळी त्याला प्रसाद देण्यात आला. मात्र, रणबीरने तो घेण्यास नकार देत, “मी तर डाएटवर आहे, तुम्ही खा,” असं त्याने सांगितलं. त्यानंतर त्याने हातातील तो प्रसाद दुसऱ्या व्यक्तीकडे दिला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
हा जुना व्हिडीओ आता पुन्हा चर्चेत आल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी रणबीरवर टीका केली आहे. प्रसाद म्हणून दिलेली मिठाई नाकारण्यासाठी डाएटचं कारण देणं योग्य आहे का, असा सवाल काहींनी उपस्थित केला. काही कमेंट्समध्ये रणबीरच्या आगामी ‘रामायण’मधील भूमिकेचाही उल्लेख करण्यात आला आहे. ‘जर तुम्ही त्याला बीफ दिलं असतं तर त्याने ते खाल्लं असतं’, असा टोमणा दुसऱ्या युजरने लगावला आहे. ‘जर त्याने एक छोटासा घास घेतला असता, तर काहीच झालं नसतं’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘गोमांस खाणारा माणूस प्रसाद कसा खाऊ शकतो आणि याला प्रभू श्रीराम यांची भूमिका दिली आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रणबीर कपूर सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रामायण’ दोन भागांत प्रदर्शित होणार असून पहिला भाग दिवाळी 2026च्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची माहिती समोर आली आहे.
