Rani Mukerji: फक्त 13 पाहुण्यांमध्ये झालेलं राणी मुखर्जीचं लग्न; फेरे सोडून कोणामागे पळालेला आदित्य चोप्रा?
Rani Mukerji: अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्या लग्नाचे फोटो आजवर समोर आले नाहीत. याविषयी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी काही खुलासे केले आहेत.

Rani Mukerji: अभिनेत्री राणी मुखर्जी आणि चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा आजही होते. 21 एप्रिल २2014 रोजी इटलीमध्ये दोघांनी अत्यंत खासगी पद्धतीने लग्न केलं होतं. विशेष म्हणजे या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अलीकडे फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी या लग्नाशी संबंधित काही रंजक किस्से सांगितल्यानंतर पुन्हा एकदा या गुपचूप लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. राणी आणि आदित्य यांच्या लग्नाचा सोहळा छोटेखानीच होता. या खासगी विवाह सोहळ्यात सुमारे 13 पाहुणे उपस्थित होते. करण जोहर आणि कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांच्यासह काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय या सोहळ्याचा भाग होते. लग्नाची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
सब्यसाची यांनी सांगितलं, लग्नाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरे दिसताच आदित्य चोप्रा त्यांना हटवण्यासाठी स्वतः धावत होते. लग्नाचा एकही फोटो किंवा व्हिडीओ बाहेर जाऊ नये, यासाठी त्याने घेतलेल्या खबरदारीची ही आठवण सब्यसाची यांनी शेअर केली. त्यामुळे या विवाहसोहळ्याची गुप्तता किती गांभीर्याने जपली गेली होती, याची कल्पना येते.
या लग्नासाठी राणी मुखर्जींने सब्यसाची यांनी डिझाइन केलेली पारंपरिक साडी नेसली होती. विशेष म्हणजे ही साडी तयार करण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला होता. सब्यसाची आणि राणी यांच्यातील जवळच्या नात्याचाही या निमित्ताने उल्लेख झाला. राणीला आपण आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, असं सब्यसाची यांनी सांगितलं.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच गोपनीयता राखली आहे. लग्नानंतर 12 वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो सार्वजनिकपणे समोर आलेले नाहीत. यामुळे या लग्नाबद्दल चाहत्यांची उत्सुकता कायम आहे. त्यांच्या खासगी आयुष्याबाबत माध्यमांपासून अंतर ठेवण्याचा दोघांचा निर्णय सुरुवातीपासूनच स्पष्ट राहिला आहे. राणी आणि आदित्य यांच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा बॉलिवूडमध्येही अनेकांना या विवाहाबद्दल अचानक माहिती मिळाली होती. मात्र, दोघांनी प्रसिद्धीपासून दूर राहून आपला खास दिवस साजरा केला.
