मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा; लग्नानंतर रश्मिका-विजय पहिल्यांदा आले कॅमेरासमोर

Rashmika and Vijay Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे लग्नानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले आहेत. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 26 फेब्रुवारी रोजी रश्मिका आणि विजयचा लग्नसोहळा पार पडला.

मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा; लग्नानंतर रश्मिका-विजय पहिल्यांदा आले कॅमेरासमोर
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 27, 2026 | 3:50 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. दोघांनीही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत एकमेकांविषयी जाहीर प्रेम व्यक्त केलं आहे. त्यानंतर ‘मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा’ पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले आहेत. लग्नसोहळ्यानंतर आज (शुक्रवार) रश्मिका आणि विजय उदयपूर एअरपोर्टवर एकत्र दिसले. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळत होता. हातात हात घेऊन दोघं एअरपोर्टवरील पापाराझींसमोर एकत्र आले आणि त्यांनी फोटोसाठी पोझसुद्धा दिले.

यावेळी रश्मिकाने लाल रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. तर विजयने को-ऑर्ड सेट घातला होता. दोघांनी अत्यंत आनंदाने पापाराझींसमोर हात जोडले आणि त्यांचे आभार मानले. विजयने रश्मिकाला पापाराझींसमोर पोझसाठी इशारा केला आणि त्यानंतर दोघांनी एकत्र फ्लाइंग किसची पोझ दिली. या दोघांना एकत्र पाहून चाहतेही खुश झाले आहेत. पापाराझी अकाऊंटवर त्यांचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गुरुवारी सकाळपासूनच चाहते रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा करत होते. विवाहस्थळी कडक नियम असल्याने आणि मोबाइल किंवा कॅमेराच्या वापरावर बंदी असल्याने कुठूनही फोटो लीक होण्याची शक्यता नव्हती. अखेर गुरुवारी संध्याकाळी रश्मिका आणि विजयने लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. यावेळी दोघांनीही एकमेकांसाठीचं प्रेम व्यक्त केलं. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते, परंतु रिलेशनशिपची जाहीर कबुली त्यांनी कधीच दिली नव्हती. त्यामुळे जेव्हा थेट लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

लग्नसोहळ्या रश्मिका आणि विजयचा लूक सर्वांत हटके आणि तितकाच पारंपरिक होता. पोशाख, दागिन्यांपासून प्रत्येक गोष्टी अत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आली होती. यावेळी विजयच्या खास लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. वर आणि वधूच्या रुपात दोघं खूपच सुंदर दिसत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Follow Us