Apoorva Makhija : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादानंतर का सोडला भारत ? अपूर्वा मखिजाने स्पष्टच सांगितलं कारण
Apoorva Mukhija: 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमधलं विधान खूप गाजलं, त्यानंतर बराच वादही झाला. या वादानंतर अपूर्वा मखीजाने भारत सोडून परदेशात सेटल होण्याचा निर्णय घेतला होता. या वादावर आणइ निर्णयावर अखेर तिने मौन सोडलं असून आपल्या निर्णयामागचं कारणंही स्पष्ट केलं.

कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखिजा (Apurva Makhija) आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. ‘रिबेल किड’ नावानेही ती ओळखी जाते. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमधील वादानंतर तिचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. तिच्यावर बरीच टीकाही झाली होती. मात्र आता याप्रकरणाला बराच काळ उलटून गेला असून आता अपूर्वाच्या आयुष्यात आणखी एक मोठा बदल झाला आहे. तिने भारत सोडून थेट न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. अपूर्वाने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये तिच्या न्यूयॉर्कला जाण्याचे कारण सांगितलं. शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली असून तिथे MBAचे शिक्षण घेणार आहे. विशेष म्हणजे, न्यूयॉर्कमध्ये राहणं हे आपलं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं, असं तिने नमूद केलंय. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने अनेक खुलासे केले.
‘इंडियाज गॉट लॅटेंट’ प्रकरणानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलल्याचं अपूर्वाने सांगितलं. सोशल मीडियावरून सतत होणारी टीका, कॅन्सल होणं आणि त्यानंतर पुन्हा करिअरमध्ये परतण्याचा प्रवास यामुळे ती मानसिकदृष्ट्या थकली असल्याचे अपूर्वाने स्पष्टपणे कबूल केलं. एखाद्या क्रिएटरला काही आठवड्यांसाठी कॅन्सल केले गेले तरी त्याचा थेट परिणाम ब्रँड डील्स आणि उत्पन्नावर होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान होण्याची मोठी चिंता असते, असंही तिने सांगितलं.
न्यूयॉर्कमध्येच का राहायचं होतं?
मी अनेक देश फिरले आणि कितीतरी शहरांना भेटी दिल्या आहेत. मात्र, पहिल्यांदा न्यूयॉर्कला या शहराशी वेगळेच नातं निर्माण झाल्याचं मला जाणवलं, असं अपूर्वा म्हणाली. या शहराची वेगवान जीवनशैली, फॅशन, खाद्यसंस्कृती आणि उंच इमारती मला विशेष आवडल्या. तसेच, मी अनेक आवडत्या वेब सीरिजमध्ये न्यूयॉर्क पाहिलं होतं. त्यामुळे या शहरात राहण्याचे माझं खूप जुनं स्वप्न होतं, याच कारणामुळे मी न्यूयॉर्कमधील एका कॉलेजमध्ये अर्ज केला आणि मला तिथे प्रवेश मिळाला असं अपूर्वाने सांगितलं.
अपूर्वाने तिच्या पॉडकास्टचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर केला असून “आता मी भारतात राहत नाही” असं त्यासोबत लिहीलं आहे. न्यूयॉर्कला जाणं हे माझं स्वप्न असलं तरी हा बदल माझ्यासाठी काहीसा भीतीदायकही आहे. माझे मित्र-मैत्रिणी, करिअर आणि आतापर्यंतचं आयुष्य भारतातच होतं. आता न्यूयॉर्कमध्ये मी डॉर्ममध्ये राहणार असून पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा अनुभव घेणार असल्याचं तिने आवर्जून नमूद केलं.
काय होता ‘इंडियाज गॉट लॅटेंट’चा वाद ?
फेब्रुवारी 2025 मध्ये समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमध्ये रणवीर इलाहाबादियाने पालक आणि लैंगिक संबंधांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अपूर्वाही या एपिसोडमध्ये पॅनेलचा भाग होती.
एका कंटेस्टंटसोबत झालेल्या तिच्या वादावरूनही सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या प्रकरणानंतर शोशी संबंधित अनेक जण कायदेशीर अडचणीत सापडले आणि विविध ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले. नंतर मला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्या होत्या असा दावा अपूर्वाने केला होता.
अपूर्वा अलीकडेच ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. मात्र, ती स्पर्धक म्हणून नव्हे तर ‘इन्फॉर्मर’ म्हणून शोमध्ये सहभागी झाली होती.