देशमुख बंधूंचं 4.7 कोटींचं कर्ज माफ झाल्याची अफवा, रितेश देशमुखने मौन सोडलं

व्हायरल कागदपत्रांमध्ये उल्लेख केल्यानुसार कोणतंही कर्ज मी किंवा माझे बंधू अमित देशमुख यांनी घेतलेलं नाही, असं स्पष्टीकरण अभिनेता रितेश देशमुखने दिलं.

देशमुख बंधूंचं 4.7 कोटींचं कर्ज माफ झाल्याची अफवा, रितेश देशमुखने मौन सोडलं

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचे बंधू, काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचं चार कोटी 70 लाख रुपयांचं कर्ज माफ झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्या मधू किश्वर यांनी त्यासंबंधीचा फोटो ट्वीट केल्यानंतर रितेश देशमुखने आपली बाजू स्पष्ट (Riteish Deshmukh on Loan Waiving) केली आहे.

“प्रिय मधू किश्वरजी, सोशल मीडियावर व्हायरल झालेली कागदपत्रं ही द्वेषपूर्ण हेतूने प्रसारित केली गेली आहेत. तुम्ही पोस्ट केलेल्या कागदपत्रांमध्ये उल्लेख केल्यानुसार कोणतंही कर्ज मी किंवा माझे बंधू अमित देशमुख यांनी घेतलेलं नाही. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया दिशाभूल करुन घेऊ नका. धन्यवाद” असं उत्तर रितेश देशमुखने ट्विटरच्या माध्यमातून दिलं.

रितेश देशमुख आणि त्यांचे बंधू आमदार अमित देशमुख यांनी 4 कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा आरोप मधू किश्वर यांनी केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर देशमुख बंधूंचा सातबारा उतारा आणि त्यावरील कर्जाच्या नोदी व्हायरल झाल्या होत्या. अखेर मधू किश्वर यांनी त्याचा फोटो ट्वीट करुन रितेश देशमुख यांना प्रश्न विचारला.

रितेश देशमुखच्या स्पष्टीकरणानंतर मधू किश्वर यांनी ट्वीट डिलीट करुन रितेशची माफी मागण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवला आहे.

‘मुंबईतील माझ्या एका विश्वासातील मित्राने ही माहिती मला पाठवली होती. माझ्या मनात तिरस्कार असलेल्या व्यक्तींविषयीही मी अशी दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक कधीच पोस्ट करत नाही. पण यावेळी माझी दिशाभूल झाली. आतापासून मी चांगल्या मित्रांवरही आंधळा विश्वास ठेवणार नाही. मनापासून माफी मागते. मला तुमच्या अभिनयाचं कौतुक आहे बरं का’ असं मधू यांनी एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

‘ज्या सौजन्यपूर्वकपणे रितेश यांनी माझी चूक निदर्शनास आणली, त्यामुळे मी खूपच प्रभावित झाले. धन्यवाद रितेश देशमुख. तुमचा हा एका ट्वीट अनेक वस्तूपाठ घालून देणारा आहे.’ असंही मधू किश्वर (Riteish Deshmukh on Loan Waiving) म्हणतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *