Salman Khan: आधी तुमच्या आईवडिलांकडे बघा..; भाऊ सोहैल खानची खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानने चांगलंच सुनावलं
Salman Khan: बिग बॉसच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सलमान खानने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. इतकंच नव्हे तर भाऊ सोहैल खानची मस्करी करणाऱ्यांनाही त्याने झापलं आहे,

अभिनेता सलमान खान सध्या ‘बिग बॉस 20’मुळे चर्चेत आहे. मात्र, यावेळी त्याने शोमध्ये केवळ स्पर्धकांच्या वागण्यावर भाष्य न करता सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरही स्पष्ट भूमिका मांडली. त्याचा भाऊ आणि अभिनेता सोहैल खान याच्या वजनात झालेल्या बदलावरून सोशल मीडियावर होत असलेल्या कमेंट्सवर सलमानने नाराजी व्यक्त केली. “पहले अपने आप को देखो…” (आधी स्वत:कडे पहा) असं म्हणत त्याने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं. सोहैल खान ‘द अलायन्स’ या रिअॅलिटी शोमध्ये वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. शोदरम्यान तो फिट आणि निरोगी दिसत होता. मात्र, शोच्या फायनलनंतर समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडीओंमध्ये त्याच्या शरीरयष्टीत लक्षणीय बदल दिसून आला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या वजनाबाबत चर्चा सुरू झाली.
सोहैलचा लूक पाहून काहींनी त्याच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली, तर काहींनी त्याच्या वजन कमी करण्यामागच्या कारणांवर अंदाज बांधण्यास सुरुवात केली. या चर्चेदरम्यान सोहैलने स्वतःही वजन कमी करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. त्याने ओझेम्पिक किंवा फॅट-बर्निंग सप्लिमेंट्स घेतल्याच्या चर्चांना नकार दिला होता. आता ‘बिग बॉस 20’च्या ताज्या एपिसोडमध्ये सलमानने सेलिब्रिटींच्या शरीरावर कमेंट करण्याच्या ट्रेंडवर भाष्य केलं. त्याने सांगितलं की कलाकारांचं वजन वाढणं किंवा कमी होणं यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र, एखाद्याच्या शरीरातील बदलाची खिल्ली उडवणं योग्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.
यावेळी सलमान म्हणाला, “आधी स्वत:कडे पहा. हे जे तुम्ही कमेंट करता ना, कोणावरही काहीही कमेंट करण्याआधी तुम्ही स्वत:चा चेहरा नीट पाहून घ्या, स्वत:चं शरीर नीट पाहून घ्या आणि त्यानंतर हे सर्व करा. आपल्या आईवडिलांकडे आधी बघा, त्यांची तब्येत बघा, मग बोला. एखाद्या व्यक्तीचं वजन वाढणं किंवा कमी होणं हे समजू शकतो, पण त्यावरून सोहैलची खिल्ली उडवणं, वरुणची मस्करी करणं, प्रत्येकाला काहीतरी बोलणं हे मान्य नाही.”
एखाद्याच्या शरीरावर किंवा दिसण्यावर कमेंट करण्यापूर्वी स्वतःकडे पाहा, असं सलमानने म्हटलंय. एवढंच नाही तर आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याकडेही आधी लक्ष द्या आणि त्यानंतर इतरांवर बोलावं, असं त्याने सुनावलं. सलमान स्वतःही गेल्या काही काळापासून त्याच्या शरीरयष्टी आणि वयावरून सोशल मीडियावरील कमेंट्सचा सामना करत आहे. ‘SVC63’ या आगामी प्रोजेक्टसाठी त्याने वजन कमी केल्याचं वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने भूमिकेसाठी सुमारे 16 किलो वजन कमी केलं आहे.
