कर्जावरून राजपाल यादवची भर कार्यक्रमात खिल्ली उडवणाऱ्यांना सलमानचं सडेतोड उत्तर
चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपाल यादवची खिल्ली उडवणाऱ्यांना आता सलमान खानने सडेतोड उत्तर दिलं आहे. राजपाल यादवच्या समर्थनार्थ सलमानने एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने काय म्हटलंय, ते सविस्तर वाचा..

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात अभिनेता राजपाल यादवची खिल्ली उडवण्यात आली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सलमान खान राजपालच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. पुरस्कार सोहळ्यात डॉलरच्या वाढत्या दराबद्दल बोलत असताना कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे पत्रकार सौरभ द्विवेदी हे चेक बाऊन्स प्रकरणावरून राजपालची खिल्ली उडवतात. डॉलरचा दर वाढला किंवा कमी झाला तरी तुम्हाला कर्जाची रक्कम तेवढीत परत करावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला होता. त्यावर आता सलमान खानने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
काय म्हणाला सलमान?
‘राजपाल भाऊ.. तू गेल्या 30 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय आणि आम्ही सतत विविध चित्रपटांमध्ये तुला भूमिकेची ऑफर दिली आहे. कारण आम्हाला तुझं काम माहीत आहे आणि तुझी भूमिका चित्रपटाला खरा अर्थ देते. तुला भरपूर काम मिळत राहील आणि डॉलरच्या किंमतीत तू काम करत राहशील. हे सत्य आहे. लक्षात ठेव.. कधीकधी प्रवाहात काही गोष्टी तोंडातून निघून जातात. जर तुला त्यावर काही उत्तर द्यायचं असेल तर ते लक्षात ठेव आणि मनापासून काम करत राहा. डॉलरचा भाव वाढो किंवा कमी होवो, काय फरक पडतो? पैसे इथे भारतातच द्यायचे आहेत’, असं सलमानने म्हटलंय.
Rajpal bhai aap 30 yrs se kaam kar rahe ho aur hum sabne aapko repeat kiya hai baar baar kyunki aap apna kaam jante ho aur ek value laate ho , kaam toh aapko bohot milega aur issi dollar rate pe milega aur milte rahega . Hakikat yeh hai .
Aur yeh yaad rakhna ke kabhi kabhi flow… pic.twitter.com/CzE86CCYXH— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 7, 2026
सलमानच्या या पोस्टला उत्तर देताना राजपाल यादवने लिहिलं, ‘सलमान भाऊ.. माझ्या 30 वर्षांच्या प्रवासाचं कौतुक केल्याबद्दल तुझं खूप खूप आभार. तू नेहमीच मला मोठ्या भावाप्रमाणे मार्ग दाखवला आहेस, लव्ह यू भाई!’ नंतर राजपालने त्याच्या सोशल मीडिया अकाऊटंवर एक व्हिडीओ पोस्ट करत जाकिर खान आणि सौरभ द्विवेदी यांना ट्रोल न करण्याचं चाहत्यांना आवाहन केलं. “हे दोघं माझ्या भावंडांसारखे आहेत, त्यामुळे त्यांना काही वाईट म्हटलात तर ते मला वाईट म्हटल्यासारखं असेल”, असं म्हणत राजपालने मनाचा मोठेपणा दाखवला.
नेमकं काय घडलं?
5 एप्रिल रोजी मुंबईत स्क्रीन अवॉर्ड्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकार सौरभ द्विवेदी आणि कॉमेडियन जाकिर खान यांनी पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन केलं होतं. मंचावर आल्यानंतर सौरभ यांनी डॉलरचा चढ-उतार, तरुणाई या विषयांवर टिप्पणी करताना राजपाल यादवची खिल्ली उडवली. “डॉलरचा दर वाढो किंवा कमी होवो.. तुम्ही घेतलेली तेवढीच रक्कम तुम्हाला परत करावी लागेल”, असं सौरभ यांनी कर्जावरून राजपालची मस्करी केली. सौरभ यांचे हे शब्द ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेला राजपाल अचानक शांत झाला आणि मग काही क्षणांनी अस्वस्थपणे हसू लागला होता. जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा राजपालच्या अनेक चाहत्यांनी या गोष्टीला अपमानास्पद म्हटलं आणि सौरभवर टीका करण्यास सुरुवात केली. चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं.