Sameer Wankhede : माझ्या घरातच क्रांती, त्यामुळे मी बाहेरही…समीर वानखेडे यांचं पत्नी क्रांती रेडकरबद्दल वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Sameer Wankhede On Kranti Redkar : समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकरचं कौतुक केलं आहे. 'माझ्या घरी क्रांती आहे. क्रांतीच असल्यावर मी वेगळं असं काय करणार', असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

Sameer Wankhede : माझ्या घरातच क्रांती, त्यामुळे मी बाहेरही...समीर वानखेडे यांचं पत्नी क्रांती रेडकरबद्दल वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Nov 03, 2026 | 7:49 PM

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी ‘मैत्रेया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला क्रांतीचा पती आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांनीही हजेरी लावली होती. यावेळी समीर यांनी पत्नीच्या कामाचं मनापासून कौतुक केलं. विशेष म्हणजे, क्रांतीच्या आडनावाचा संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका मिश्किल वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘मैत्रेया’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना समीर वानखेडे यांनी सुरुवातीलाच आपण या क्षेत्रासाठी नवीन असल्याचं सांगितलं. चित्रपट, गाणी आणि मनोरंजनविश्वातील गोष्टींची आपल्याला फारशी माहिती नसल्याचं त्यांनी मिश्किलपणे नमूद केलं. मात्र, क्रांतीनं मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर निर्माण केलेली ओळख आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले समीर वानखेडे?

Loading...

समीर वानखेडे म्हणाले की, ‘एक दिग्दर्शिका म्हणून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चं नावं तिनं कमावलंय. मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. पुरूषांच्या जगात एक महिला असून तिनं स्वत:चं नाव कमावलं याचा मला खूप गर्व आहे. मला अनेकदा लोक म्हणतात की, सर तुम्ही लढता मग तुमची शक्ती किंवा उर्जा काय आहे? यावर मी त्यांना सांगतो की, माझ्या घरामध्येच राणी लक्ष्मीबाई आहे.’

‘मी जेव्हा ड्युटीवर असतो किंवा आमचा जो काही ड्रग्स विरोधात लढा चालू आहे. तर लोक मला म्हणतात की, सर तुम्ही कसा एवढा संघर्ष करता. तर मी इथेसुद्धा तेच म्हणेन माझ्या घरी क्रांती आहे. क्रांतीच असल्यावर मी वेगळं असं काय करणार. शिवाय तिच्या नावामध्ये रेडकर आहे. रेड..कर! जर नावातच रेडकर असेल तर मी बाहेरसुद्धा तेच करणार. त्यामुळे या सिनेमासाठी तिला माझ्या खूप शुभेच्छा, मला तिचा खूप अभिमान आहे. ती अशीच पुढे जाओ मी तिच्या पाठीशी आहेच.’ असं समीर यांनी शेवटी म्हटलं.

 

दरम्यान, क्रांती रेडकरनं अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं दिग्दर्शित केलेल्या ‘काकण’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातून ती पुन्हा एकदा दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us