महिला आयोगासमोर संजय दत्तने जोडले हात, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सोमवारी महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये हजर झाला होता. या वेळी त्याने वादग्रस्त ठरलेल्या 'सरके चुनरी तेरी' गाण्याबाबत माफी मागितली आहे.

Bollywood News : बॉलिवूडमधील गाण्यांतील आशय आणि सादरीकरणावरून वाद निर्माण होण्याची परंपरा नवी नाही. मात्र अलीकडेच ‘सरके चुनरी तेरी’ या गाण्यामुळे निर्माण झालेला वाद चांगलाच गाजत असून या प्रकरणात अभिनेता संजय दत्तला थेट राष्ट्रीय महिला आयोग समोर हजर राहावे लागले.
‘केडी: द डेविल’ चित्रपटातील ‘सरके चुनरी तेरी’ या गाण्यावर अश्लीलतेचे आरोप झाले होते. गाण्यातील काही बोल आणि दृश्यांमुळे महिलांच्या सन्मानाला ठेस पोहोचत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने संजय दत्तला नोटीस बजावत स्पष्टीकरणासाठी सूचित केले होते.
आयोगासमोर हजेरी
सोमवारी संजय दत्त स्वतः दिल्लीतील महिला आयोगाच्या कार्यालयात उपस्थित झाला. यावेळी माध्यमांनी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आयोगासमोर त्याने आपली बाजू मांडत तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सुनावणीदरम्यान संजय दत्तने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आयोगासमोर माफी मागितली. यासोबतच त्याने एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम जाहीर केला. त्याने 50 आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगितले. त्याच्या या निर्णयाकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
नोरा फतेहीलाही समन्स
या गाण्यात अभिनेत्री नोरा फतेही देखील दिसत असल्याने तिलाही महिला आयोगाने समन्स पाठवले आहे. मागील सुनावणीवेळी तिच्या वतीने वकील हजर झाले होते. मात्र आयोगाने ते मान्य केले नाही. आयोगाने स्पष्ट केले आहे की, नोरा फतेहीला वैयक्तिकरित्या हजर राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तिला अंतिम संधी देण्यात आली आहे.
वाद वाढत गेल्यानंतर आणि महिला आयोगाने कठोर भूमिका घेतल्यानंतर संबंधित गाणे यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. गाण्याच्या निर्मात्यांनी ‘गाण्याच्या आशयाची कल्पना नव्हती अशी दिलेली सफाई आयोगाने फेटाळून लावली. अशा प्रकारच्या कारणांद्वारे जबाबदारी टाळता येणार नाही असेही आयोगाने स्पष्ट केले.
पुढील कारवाईकडे लक्ष
या प्रकरणात आयोग पुढील सुनावणीदरम्यान काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनोरंजन क्षेत्रातील आशय आणि सामाजिक जबाबदारी याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हा संपूर्ण वाद केवळ एका गाण्यापुरता मर्यादित नसून मनोरंजन क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यामधील समतोल राखण्याची गरज अधोरेखित करतो.