तोटा झाला की कला आठवते… ‘आमने सामने’ नाटकाच्या वादावर संजय मोने स्पष्टच बोलले
Aamne Saamne Natak Controversy: गेल्या काही दिवसांपासून ‘आमने सामने’ नाटक हे चांगलेच चर्चेत आहे. आता या नाटकावरुन सुरु असलेल्या वादावर ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट काय आहे? चला जाणून घेऊया...

गेल्या काही दिवसांपासून ‘आमने सामने’ हे नाटक चर्चेत आहे. या नाटकाभोवती निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमीवर सध्या कथानकापेक्षा पडद्यामागील आर्थिक गणित आणि कलाकारांच्या हक्कांवरच अधिक चर्चा होत आहे. या नाटकातील कलाकारांना अचानक काढून टाकल्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप संपायचे नाव घेत नाहीये. या पार्श्वभूमीवर मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक संजय मोने यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. कोणाचेही किंवा कोणत्याही नाटकाचे थेट नाव न घेता, त्यांनी व्यावसायिक नाटकांच्या नफा-तोट्याच्या समीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
‘आमने सामने’ नाटकाच्या वादाची सुरुवात अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांच्या आरोपांनी झाली. केवळ मानधनात वाढ मागितली म्हणून निर्मात्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला नाटकातून काढून टाकले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. यावर निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनीही आपली बाजू मांडत, कलाकारांकडून वारंवार होणाऱ्या अवास्तव मानधनवाढीच्या मागण्यांमुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट केले होते.
काय आहे संजय मोने यांची पोस्ट?
आता मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. संजय मोने यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर, “निर्मात्याला तोटा झाला की त्याला कला आठवते आणि फायदा झाला की व्यवसाय आठवतो.मग कलाकारांना असं वाटलं तर ते गैर आहे की बरोबर?” असे म्हटले आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेतला केलेल्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
याआधीही अनेक कलाकारांनी व्यक्त केली होती खंत
‘आमने सामने’ या नाटकावरून सुरु असलेला वाद गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या वादावर अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते यांसारख्या ज्येष्ठ रंगकर्मींनीही आपली मते मांडली आहेत. आता संजय मोने यांनी कोणाचेही नाव न घेता केलेल्या पोस्टने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे.