जगाला ज्याची भीती अखेर तेच घडलं, युद्धाला पुन्हा तोंड फुटले, अमेरिकेचा इराणच्या केश्म बेटावर मोठा हल्ला
America Attack on Iran Qeshm Island: पश्चिम आशियात पुन्हा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणच्या केश्म बेटावर पुन्हा हल्ला चढवला. यामुळे युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत हल्ला करणार नसल्याचे म्हटल्यानंतरच ही कारवाई झाली.

America Attack on Iran Qeshm Island: इराणच्या सामारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या केश्म बेटावर अमेरिकेने काल जोरदार हवाई हल्ले चढवले. याविषयीची माहिती इराणची वृत्तसंस्था IRNA ने दिली आहे. तर वॉल स्ट्रीट जर्नलनेही त्याची पुष्टी केली आहे. या ताज्या हल्ल्यामुळे मध्य-पूर्वेत पुन्हा अशांतता पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूने शांतता होती. जहाजांवरील हल्ल्याचे वृत्त समोर आलेले होते. कालच मध्यावधी निवडणुकादरम्यान एका सभेला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इराणवर हल्ला करणार नसल्याचे म्हटले आणि ही कारवाई झाली.
केश्म बेटावर इराणचा शस्त्रांचा खजिना
केश्म बेट आणि होर्मूझ समुद्रधुनी ही इराणसाठी महत्त्वाची आहे. या बेटावर काल अमेरिकेने अनेक हवाई हल्ले केल्याचा दावा इराणच्या वृत्तसंस्थेने केला आहे. यामध्ये इराणच्या नौदलाचा तळ आणि इतर महत्त्वाच्या शस्त्रसाठ्यावर निशाणा साधण्यात आला. बेटावर अनेकदा स्फोटाचे आवाज झाल्याचा दावा वृत्तसंस्थेने केला आहे. या ताज्या हल्ल्याने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध भडकण्याची शक्यता आहे. तर त्याचे परिणाम आता सौदी अरबसह आखाती देशांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शब्द फिरवला
अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातील एका सभेत बोलताना ट्रम्प यांनी आम्ही इराणसोबतचे युद्ध जिंकलो आहोत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूने प्रत्यक्ष कोणतेही युद्ध सुरू नाही आणि हल्ला करण्यात येणार नाही असा सूर आळवला होता आणि लागलीच इराणच्या केश्म बेटावर हे ताजे हल्ले झाले. यामुळे ट्रम्प यांच्या करणी आणि कथनीत मोठे अंतर असल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेविषयी जागतिक पातळीवर पुन्हा साशंकता निर्माण झाली आहे. मध्यावधी निवडणुकीचे परिणाम काय लागतात याकडेही जगाचे लक्ष लागलेले आहे. मध्यावधीचे निकाल ट्रम्प यांच्याविरोधात गेल्यास चित्र झपाट्याने पालटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक बाजारात इंधनाच्या किंमतींवर परिणाम
या नवीन लष्करी कारवाईने मध्य-पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या ताज्या हल्ल्याच्या भीतीने आशियाई बाजारात तेलाच्या किंमतीत थोडी उसळी दिसून आली. होर्मूज समुद्रधुनीजवळील या घडामोडींमुळे तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आता इराण या हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया देते याकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.
