सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास आधी काय झालं होतं? मॅनेजरने सांगितलं सत्य

ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. त्यांच्या निधनाच्या अर्धा तास आधी नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते.

सतीश शहा यांच्या निधनाच्या अर्धा तास आधी काय झालं होतं? मॅनेजरने सांगितलं सत्य
Satish Shah
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2025 | 4:09 PM

हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शहा यांचं 25 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (रविवार) त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. शहा यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश शहा यांच्या निधनाच्या आधी काय घडलं होतं, याचा खुलासा त्यांच्या मॅनेजरने केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सतीश शहा यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी सांगितलं, “काल दुपारी जेवताना हे सर्व घडलं होतं. दुपारी पावणे-दोन, दोन वाजताच्या सुमारास ते जेवायला बसले होते. त्यांनी एक घास खाल्ला आणि अचानक बेशुद्ध झाले. अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका आली. जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं.”

सतीश शहा यांच्या मॅनेजरने सांगितलं की, गेल्या काही काळापासून ते किडनीशी संबंधित समस्यांशी त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना दीड महिने पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला होता. नंतर ते बरे होऊन घरीसुद्धा परतले होते. याशिवाय सतीश यांचे मित्र आणि दिग्गज अभिनेते राकेश बेदी यांनी ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना सांगितलं की त्यांना हृदयाशी संबंधित समस्याही होत्या. नंतर किडनी ट्रान्सप्लांट झाल्यामुळे त्यांच्या शरीराला ते मानवलं नाही.

सतीश शहा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंकज कपूर, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, नसीरुद्दीन शाह, दिलीप जोशी, रुपाली गांगुली, राजेश कुमार, अनंग देसाई आणि फराह खान यांसारखे सेलिब्रिटी पोहोचले होते. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. सतीश शहा यांच्या पार्थिवाकडे पाहून अभिनेत्री रुपाली गांगुली ढसाढसा रडली. राजेश कुमारलाही अश्रू अनावर झाले होते.

सतीश शहा आणि राजेश कुमार यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेत पिता-पुत्राची भूमिका साकारली होती. राजेश या मालिकेत रोशेश साराभाईच्या तर सतीश शहा हे त्याचे वडील इंद्रवदन साराभाईंच्या भूमिकेत होते.