Bandhu Movie : मराठी चित्रपटाला थिएटरसाठी संघर्ष! ‘शेवटच्या स्क्रीनपर्यंत लढणार! ‘बंधू’ला वाचवण्यासाठी दिग्दर्शकाची हात जोडून कळकळीची विनंती
बंधू सिनेमाचे उत्कृष्ट कथानक असूनही या मराठी सिनेमाला आपल्याच महाराष्ट्रात शो साठी वणवण करावी लागते आहे. याच पार्श्वभूमीवर या सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना हात जोडत भावनिक आवाहन केलं आहे.

दोन मुलांसाठी आईची असलेली माया आणि दोन भावांचे एकमेकांचे खारी बिस्किटासारखे प्रेम बंधू या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. उपेंद्र लिमये. जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका या असलेला बंधू हा सिनेमा 20 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रेम, राग, माया, उत्कृष्ट कथा आणि दर्जेदार अभिनयाने परिपूर्ण असा बंधू सिनेमा आहे. मुख्य यात मोठ्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या लहानश्या कलाकाराने उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. उत्कृष्ट कथानक असूनही या मराठी सिनेमाला आपल्याच महाराष्ट्रात शो साठी वणवण करावी लागते आहे. याच पार्श्वभूमीवर या सिनेमाचे दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना हात जोडत भावनिक आवाहन केलं आहे.
बंधूच्या दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर आपलं मत मांडत भावना व्यक्त्य केल्या आहेत ते म्हणाले नमस्कार मी नितीन सुपेकर बंधू सिनेमाचा लेखक दिग्दर्शक निर्माता,मला फारसं मीडियावर समोर बोलायला आवडत नाही पण बंधू सिनेमासाठी मला माझ्या प्रेक्षकांशी, माझ्या फिल्मेकरशी आणि त्या लोकांशी बोलायचंय जे लोक वर्षोनुवर्षे सिनेमासाठी काम करतात. काल रात्री एका थिएटरमध्ये गेलो तिथे फार मोठं स्वागत झालं. थिएटर फुल प्रेक्षकांनी भरलेले होते. संबंध महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद येतोय परंतु अचानक रात्री मेसेज आला तुमचा सिनेमा महाराष्ट्रात थिएटरमधून कमी करण्यात येतोय. तर मग मला हे कळतं नव्हतं की प्रेक्षकांचा प्रतिसाद खोटा आहे. आमचे प्रयत्न खोटे आहेत, आम्ही अजून कुठे कमी पडतोय? अर्थात प्रमोशनला कमी पडतोय हे मराठीच्या बाबतीत घडतच आहे. पण तेवढा पैसा निर्माते लावू शकत नाहीत कारण रिकव्हरीचा विषय असतो, अज्ञान असतं हे मी समजू शकतो. परंतू माझा सिनेमा असं सहजासहजी सोडणं मला पटत नाहीये.
मी गेले 2024 पासून या सिनेमावर 3 वर्षे या सिनेमावर मेहनत घेतोय. आता सिनेमा ज्यांनी पाहिलयं त्यांना हे कळेलचं. माझ्या संपूर्ण टीमने 100 टक्के योगदान दिलंय. मी सुद्धा माझ्या परीने खूप काम केलेले आहे. पण असा अचानक मोठे सिनेमे येणं हतबल होणं आणि मराठी सिनेमाला अलगद माशी सारख काढून टाकणं मला हे पटतं नाहीये. सिनेमे एकाच वेळी खूप आलेत हे मान्या आहे मला. परंतु मी शेवटच्या स्क्रिनपर्यंत या सिनेमासाठी झगडत राहिन प्रयत्न करेन,
पुन्हा काल मला एक मेसेज आला, ज्यामध्ये एका माणसाने त्याच्या मित्रांना हा सिनेमा दाखवला. ज्यामध्ये तमिळ, मध्य प्रदेश. गुजराती असे अनेक लोक होते. त्यामधील एकाने तुम्ही तमिळमध्ये हा का सिनेमा बनवत नाही असे त्याने विचारले आणि मला वाटते हीच त्या सिनेमाची ताकद आहे. प्रत्येकाला आपलंस करण्याची. जिथे हा सिनेमा आता चालू आहे. ती मी स्वत:भेट देणार आहे मी सिनेमा चालवणार आहे, असे दिग्दर्शक म्हणाले. आता महाराष्ट्रात जवळपास 12 लाखांच्या वर रंगकर्मी आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पोस्ट शेअर केलीत या सिनेमाला उचलून धरलंत तर हा सिनेमा अजूनही पोहोचेल.
भाऊ भाऊ एकत्र येतील… समाजातील हिंसा कमी होईल.. समाजमन सुधारेल त्यामुळे हा प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे.महाराष्ट्रभर जर आपण ही चळवळ राबवली #saveबंधू तर प्रेक्षक वाढेल. माझ्या काही दिग्दर्शक तसेच कलाकार मित्रांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केलेत. महेश टिळेकर सर,अमोल कोल्हे सर, नागराज मंजुळे सर, सुशांत शेलार सर यांनीही लोकांना आवाहन केलंय. आता सर्वांनी हा सिनेमाची पोस्ट शेअर केली तर सर्वांपर्यंत हा सिनेमा पोहोचेल. मला मदत करा. मी प्रयत्न न करता हरणार नाही आहे. आता या प्रयत्नांना तुमच्या साथीची जोड हवी. कृपा करून #saveबंधू या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा.