शारदा यांचं 60 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्यामुळे फिल्मफेअरला बदलावा लागला होता त्यांचा नियम, गाण्याने मोडले होते सर्व रेकॉर्ड
शारदा यांचं 60 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचं स्टारडमला हादरवून सोडलं होतं. त्यांच्यामुळे फिल्मफेअरला बदलावी लागली होती त्यांची पद्धत. गाण्याने मोडले होते सर्व रेकॉर्ड.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात 1966 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सूरज’ हा चित्रपट विशेष गाजला. राजेंद्र कुमार यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकी गायिका शारदा यांनी गायलेलं ‘तितली उड़ी, उड़ जो चली’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, या गाण्यामुळे फिल्मफेअरच्या पुरस्कार पद्धतीत मोठा बदल झाला.
लहान मुलांचं देखील सर्वात आवडतं गाणं
त्या काळात फिल्मफेअरमध्ये पार्श्वगायनासाठी पुरुष आणि महिला गायकांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिले जात नव्हते. 1966 मध्ये ‘सूरज’ चित्रपटातील मोहम्मद रफी यांचं ‘बहारों फूल बरसाओ’ आणि शारदा यांचं ‘तितली उड़ी’ ही दोन्ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. दोन्ही गाण्यांना जवळपास समान मते मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, अखेर मोहम्मद रफी यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर या निर्णयावर चर्चा आणि वाद वाढला आणि पुढील वर्षापासून फिल्मफेअरने पुरुष आणि महिला पार्श्वगायकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू केले. शारदा यांना विशेष बेस्ट न्यूकमर पुरस्कार देण्यात आला.
‘तितली उड़ी, उड़ जो चली’ हे गाणं शंकर-जयकिशन यांच्या संगीतावर आधारित होतं, तर त्याचे शब्द गीतकार शैलेंद्र यांनी लिहिले होते. हे गाणं वैजयंतीमाला आणि मुमताज यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हलकीफुलकी, चुलबुली आणि सहज लक्षात राहणारी चाल यामुळे हे गाणं रेडिओवरही मोठ्या प्रमाणात वाजत असे. विशेषतः लहान मुलांमध्ये हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं.
89 व्या वर्षी शारदा यांचं निधन
शारदा राजन अयंगर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवेशही रंजक होता. राज कपूर यांनी त्यांना तेहरानमध्ये गाताना ऐकलं आणि मुंबईत येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शंकर-जयकिशन यांनी त्यांना गाण्याची संधी दिली. ‘तितली उड़ी’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेलं गाणं ठरलं. पुढे 1970 मध्ये ‘जहां प्यार मिले’ चित्रपटातील ‘बात जरा है आपस की’ या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या लोकप्रियतेच्या काळात शारदा यांनी आपल्या वेगळ्या आवाजाने हिंदी संगीतविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. पुढे त्यांना अपेक्षित तितक्या संधी मिळाल्या नाहीत, तरी ‘तितली उड़ी’ या गाण्याने त्यांना कायमची ओळख मिळवून दिली. जून 2023 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी शारदा यांचं निधन झालं. मात्र, त्यांचा आवाज आणि ‘तितली उड़ी’ची मोहकता आजही संगीतप्रेमींच्या मनात ताजी आहे.
