Shekhar Suman : शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढला, 24 तासांसाठी बनला भाजपचा नेता, राजकारणामुळे चर्चेत राहिला बॉलिवूड अभिनेता

Shekhar Suman : बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन त्याच्या राजकीय करिअरमुळे चर्चेत राहिलेला. याबद्दल अभिनेत्यानं एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Shekhar Suman : शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूक लढला, 24 तासांसाठी बनला भाजपचा नेता, राजकारणामुळे चर्चेत राहिला बॉलिवूड अभिनेता
| Updated on: Oct 12, 2026 | 7:48 PM

अभिनेता आणि सूत्रसंचालक शेखर सुमन त्याच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या टप्प्यांवर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांशी जोडला गेलेला. त्यानं २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. शेखर नंतर २०२४ मध्ये भाजपमध्ये सामील झाला, पण २४ तासांपेक्षा कमी काळातच त्यानं पक्ष सोडला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, या अभिनेत्यानं आपल्या लहान राजकीय कारकिर्दीबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं.

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाला की, ‘तो फक्त एक दिवस होता. २४ तास सुद्धा नाही, २४ मिनिटंच असायला हवीत. जेव्हा एखादी व्यक्ती बेशुद्ध होते किंवा स्वतःच्याच विश्वात हरवून जाते, तेव्हा अशा गोष्टी घडतात.’ अभिनेता पुढे म्हणाला, ‘मी ज्यांना भेटलो, मी त्यांचा झालो. असं होतं. मला कोणताही पश्चात्ताप नाही, किंवा मी ती चूक कधीच मानत नाही. तो फक्त एक चुकीचा अंदाज किंवा चुकीचा निर्णय होता. मला राजकारणात रस नाही. तुम्हाला वाटतं की, कोणीतरी तुमच्यासोबत आहे, पण प्रत्यक्षात ते नसतात.’

Loading...

मुलाखतीदरम्यान, शेखर सुमननं २००९ च्या निवडणुकीत भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवल्याचा उल्लेख केला. अभिनेता म्हणाला, ‘मी त्यांच्या विरोधात नव्हतो. आम्ही फक्त वेगवेगळ्या पक्षांमध्ये होतो. ते राजेश खन्ना यांच्या विरोधातही निवडणूक लढवत होते. ते नाराज झाले होते. पण, ते का नाराज झाले होते हे मला समजत नाही. आम्ही दोघेही उमेदवार होतो आणि ती आमच्या वेगवेगळ्या विचारधारांमधील लढाई होती. मी त्यांचा खूप आदर करतो, त्यांनी नेहमीच खूप पाठिंबा दिला आहे. मुंबईत त्यांनी मला खूप मोठा आधार दिला. मी त्यांना सांगितलं नाही म्हणून त्यांना अचानक खूप वाईट वाटलं, आणि कदाचित मी सांगायला हवं होतं.’

सोनिया गांधींसोबत भेट

शेखर सुमन म्हणाला की, राजकारणात येण्यासाठी त्याला त्यांच्या आजूबाजूच्या लोकांकडून प्रेरणा मिळाली आणि या सगळ्याची सुरुवात २००४ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीनं झाली. अभिनेता म्हणाला, ‘माझी पहिली भेट सोनिया गांधींसोबत आयोजित करण्यात आली होती. मी त्यांना सांगितलं की, मला राजकारणाचं काहीही ज्ञान नाही आणि मला कोणत्याही पक्षात सामील व्हायचं नाही. तिथं प्रियांका गांधी बसल्या होत्या आणि त्यांनी मला पाठिंबा दिला.’

‘मग २००९ मध्ये मला शत्रुघ्नजींना सांगायचं होतं की, अहमद पटेल यांच्यासह अनेक लोकांनी माझी समजूत काढली. त्यांनी मला निवडणूक लढवण्याचा आग्रह केला आणि प्रेमानं समजावण्याचा प्रयत्न केला. मी कुठून निवडणूक लढवणार आहे किंवा माझ्या विरोधात कोण असेल हेही मला माहीत नव्हतं. मग मला कळलं की शत्रुघ्नजी माझ्या विरोधात असतील. जेव्हा मी होकार दिला, तेव्हा पाच मिनिटांतच नितीश कुमारजींचा फोन आला. मी राजकारणात येत आहे हे मी त्यांना का सांगितलं नाही, असं त्यांनी विचारले. मी आधीच वचन दिलं आहे असं सांगितल्यावर ते हसले आणि म्हणाले, सर्व काही विसरून माझ्या पक्षात सामील हो. मला माहीत होतं की, मी निवडणूक जिंकणार नाही.’ असं शेखर सुमननं शेवटी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us