Nana Patekar : शिवसेनेनं तिकिट ऑफर केलेलं का? नाना पाटेकरांनी सांगितलेलं सत्य; म्हणाले, बाळासाहेब मला…
Nana Patekar On Politics : नाना पाटेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर एका जुन्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी भाष्य केलेलं.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचे गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी कळताच, त्यांचे चाहते, चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी नानांच्या आठवणी सांगताना म्हटलं की, त्यांच्यासारखा अभिनेता पुन्हा क्वचितच पाहायला मिळेल. बाळासाहेब ठाकरे हे नाना पाटेकर यांना वडिलांसारखे होते. अनेकदा नानांनी याबद्दल भाष्यही केलेलं. नाना पाटेकर राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा होत्या. यावर स्वतः नानांनी उत्तर दिलेलं.
काय म्हणाले होते नाना पाटेकर?
इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांना ‘शिवसेनेनं तुम्हाला तिकीट ऑफर केलेलं का?’ असं विचारण्यात आलं. त्यावर नाना पाटेकर म्हणाले की, ‘आमची मैत्री होती. बाळासाहेब मला वडिलांसारखे होते, पण राजकारणाशी माझं काही घेणं–देणं नाही. तिकीट तर नव्हतं दिलं.’
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते? असं विचारलं असता नाना म्हणाले की, ‘मी त्यांना म्हटलेलं एकत्र राहून काम केलं तर आमचं भलं होईल. शरद पवार माझे चांगले मित्र आहेत,राजकारणातले बहुतेक नेते माझे चांगले मित्र आहेत. पण, मी कधीच त्यांच्याकडे काहीच मागितलं नाही. ज्यादिवशी काही मागितलं तर त्या दिवशी मैत्री संपेल.’
दरम्यान, माध्यमांशी बोलताना नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना संजय राऊत म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टीवर नानांचा एक वेगळाच प्रभाव होता. ते केवळ एक अभिनेतेच नव्हते, तर साहित्य आणि कवितेची सखोल जाण असलेले एक संवेदनशील कलाकारही होते. संजय राऊत यांनी नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, त्या दोघांचं नातं खूप घनिष्ठ होतं. नाना त्यावेळी स्वतःला शिवसैनिक मानत असत आणि मराठी माणूस चळवळीलाही पाठिंबा देत असत. संजय राऊत यांनी सांगितलं की, नानांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही संपर्क होते. मात्र, ते एखाद्या गोष्टीशी सहमत असोत वा असहमत, आपलं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखले जायचे. ते अनेकदा राजकीय व्यासपीठांवरून राजकारण्यांविरुद्ध बोलायचे.
संजय राऊत यांनी नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक जुना किस्साही सांगितला. त्यांनी सांगितलं की, एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर टिप्पणी केली होती. नानांनी आपला विरोध दर्शवला, ज्यामुळे बाळासाहेबांना राग आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाना मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांसमोर बसले. त्यावेळी बाळासाहेब नाना पाटेकरांवर रागावलेले. नानांनी साधेपणानं आणि आदरानं उत्तर दिले, ‘तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात; तुम्हाला रागावण्याचा पूर्ण हक्क आहे.’ राऊत म्हणाले की, नाना बाळासाहेबांना आपले गुरू आणि वडिलांसमान मानायचे.
