Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम

| Updated on: Apr 21, 2022 | 8:33 AM

प्रतापगड... हा फक्त शब्द जरी ऐकला तरी डोळ्यांसमोर उभी राहते छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कट आणि महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा केलेला वध. (Sher Shivraj Review)

Sher Shivraj Review: शेर शिवराजची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम
Sher Shivraj Review
Image Credit source: Tv9
Follow us on

प्रतापगड… हा फक्त शब्द जरी ऐकला तरी डोळ्यांसमोर उभी राहते छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाशी गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कट आणि महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा केलेला वध. इतिहासातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र माहित असलेल्या गोष्टीच मोठ्या पडद्यावर दाखवणं हे प्रेक्षकांना माहित नसलेल्या कथेपेक्षा अधिक आव्हानात्मक असतं. प्रतापगडाच्या (Pratapgad) रणसंग्रामातील छोट्यातली छोटी गोष्ट आजच्या पिढीला मोठी शिकवण देऊन जाते आणि याचसाठी इतिहासाचा बारकाईने केलेला अभ्यास हा अधिक महत्त्वाचा असतो. याच बारकाईंनी परिपूर्ण असं ऐतिहासिक कथानक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Review) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंडनंतर ‘शिवराज अष्टका’तील हा त्यांचा चौथा चित्रपट आहे.

नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखं रोवून पोट फाडून त्याचा वध केला होता. याच कथेचा संदर्भ देत ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची सुरुवात होते. अफजल खान किती क्रूर होता याचं चित्रण करणाऱ्या घडामोडी दाखवत असतानाच दुसरीकडे महाराजांशी एकनिष्ठ असलेले मावळे किती शौर्यवान होते, जिजाऊंची महाराजांना असलेली खंबीर साथ याचंही चित्रण समर्पकरित्या करण्यात आलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, आयुर्वेदाचा अभ्यास, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. याच गोष्टींचा आधार घेत अफजल खानाच्या वधाच्या दृश्यापर्यंत उत्सुकता ताणून ठेवली आहे. वधाच्या दृश्यात जेव्हा चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात समोर येतो, तेव्हा अक्षरश: अंगावर काटा येतो. महाराजांच्या स्वभावातील प्रत्येक पैलू त्याने त्याच्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांकडे मावळ्यांची विशिष्ट फौज होती. त्याप्रमाणे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडे ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची विशिष्ट फौज आहे. यातील प्रत्येक कलाकार त्याला दिलेल्या भूमिकेला पूर्ण न्याय देताना दिसतो. त्यातही ‘शेर शिवराज’मध्ये चिन्मयसोबतच स्वत: दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, आस्ताद काळे, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, मृण्मयी देशपांडे आणि वर्षा उसगांवकर यांनीही दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. अफजल खानाच्या भूमिकेसाठी अभिनेते मुकेश ऋषी यांची केलेली निवड योग्य ठरते.

‘शेर शिवराज’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन घडत असतानाच मध्यांतरानंतर काही घडामोडी ताणल्या गेल्यासारख्या वाटतात. या चित्रपटाच्या कथेला संगीताची उत्तम साथ लाभली आहे. तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करणं हे जवळपास अशक्यच होतं. मात्र आपल्यासमोरील शत्रू हा कितीही बलाढ्य किंवा शक्तीशाली असला तरी त्यावर कौशल्याने, अभ्यासपूर्ण मार्गाने, आपल्याच इतिहासातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्या अभ्यासाने आपण त्याला मात देऊ शकतो ही बाब अत्यंत ठळकपणे यातून सांगण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय. काही दृश्यांमध्ये ग्राफिक्स आणखी चांगल्याप्रकारे करता येऊ शकतं. पण अर्थात कथेपुढे, संवादांपुढे आणि कलाकारांच्या दमदार अभिनयापुढे ही बाब नगण्य ठरते.

इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला तर त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. ही शिकवण अगदी वर्तमानकाळातही आपल्याला उपयोगी पडेल अशी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. मात्र त्या क्रूर खानासमोर जाईपर्यंत त्यांनी आखलेली रणनिती आणि त्यातील बारकावे हेसुद्धा बरंच काही शिकवून जातात. ऐतिहासिक कथानक असलेल्या चित्रपटांसमोरील सर्वांत मोठं आव्हान म्हणजे थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या मनात ती भावना निर्माण करणं आणि ‘शेर शिवराज’ अत्यंत ठळकपणे ती भावना निर्माण करतो.

‘शेर शिवराज’ या चित्रपटाला चार स्टार.

हेही वाचा:

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा रायगडावर दमदार प्रयोग, जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष उपक्रम

Indian Idol Marathi : ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’, सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल